पुणे :पुणे ते दुबई (स्पाईस जेट) या आंतरराष्ट्रीय विमानाला गेल्या काही दिवसांपासून उड्डाणाला सातत्याने उशीर होत आहे. गेल्या सात दिवसांपासून या विमानाला पुण्यातून उड्डाण करताना अर्धा तास ते अडीच तासांपर्यंत उशीर झाला आहे. नियोजित वेळेत विमानतळावर येऊनदेखील उड्डाणाला सतत उशीर होत असल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय विमान सेवा वेळेवर उड्डाणासाठी विमानतळ प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबई, बँकॉक आणि सिंगापूर या तीन शहरासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू आहेत. एअर इंडियाकडून सिंगापूर विमान सेवा काही दिवसांसाठी बंद केली आहे. यामुळे या तीनही विमानांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुबईसाठी पुण्यातून स्पाईस जेट आणि इंडिगोकडून दररोज विमानसेवा आहे. स्पाईस जेटकडून एसजी ५१ हे विमान दररोज रात्री आठ वाजून ५० मिनिटांनी दुबईसाठी उड्डाणाची वेळ आहे; पण गेल्या काही दिवसांपासून या विमानाला सतत उशीर होत आहे. त्याचा फटका विमान प्रवाशांना बसत आहे. पुण्यातून या विमानाला उशीर झाल्याने प्रवाशांचा पुढील प्रवासाला विलंब होतो. परंतु यावर विमानतळ प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना होताना दिसत नाही.
इंडिगोच्या उड्डाणालाही लेटमार्क
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईसाठी स्पाईस जेट आणि इंडिगो या कंपन्यांची विमान सेवा आहे. इंडिगोची विमान दररोज मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांनी पुण्यातून दुबईसाठी उड्डाण करते. या विमानालाही गेल्या काही दिवसांपासून उड्डाणासाठी अर्धा ते एक तास उशीर होत आहे. परंतु विमान दुबईला वेळेवर पोहोचते. परंतु पुण्यात मात्र प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते.
स्पाईस जेट (एसजी ५१)
दिनांक - झालेला उशीर
२४ जुलै - ३६ मिनिटे
२५ जुलै - दोन तास २० मिनिटे
२६ जुलै - ३५ मिनिटे
२७ जुलै - एक तास ३८ मिनिटे
२९ जुलै - ३१ मिनिटे
३० जुलै - ३० मिनिटे
पुणे विमानतळावरून फारच मर्यादित आंतरराष्ट्रीय उड्डाणे असताना अशा सेवांकडून वेळेचे काटेकोर पालन अपेक्षित असते. उड्डाणास जर वारंवार उशीर होत असेल तर ते प्रवाशांना मोठ्या गैरसोयी होण्याबरोबरच आर्थिक नुकसानीचेदेखील ठरू शकते.पुणे ते दुबई उड्डाण हे जगातील महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांमधील व्यावसायिक, सामाजिक व सांस्कृतिक दुवा आहे. पुणे हे प्रमुख औद्योगिक, आयटी, शिक्षण व स्टार्टअप केंद्र आहे, तर दुबई हे जागतिक व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाचे प्रवेशद्वार मानले जाते. सतत उशीर होत असल्यास स्लॉटचा पुनर्विचार, दंडात्मक कारवाई किंवा उड्डाणांच्या परवान्यांची पुनर्तपासणी यासारखी कठोर कारवाईचा विचार विमानतळ प्रशासन करावयास हवा. - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ