पुण्यात पंचरंगी लढत
By Admin | Updated: September 26, 2014 05:25 IST2014-09-26T05:25:50+5:302014-09-26T05:25:50+5:30
महायुती व आघाडी तुटल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतील इच्छुकांना आठही मतदारसंघांत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची संधी मिळणार

पुण्यात पंचरंगी लढत
पुणे : महायुती व आघाडी तुटल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतील इच्छुकांना आठही मतदारसंघांत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने पुण्यात पंचरंगी लढत होणार आहे. त्यामुळे पुण्यातील आठही मतदारसंघांतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे अनेक वर्षे आघाडी व महायुतीच्या मतांवर बालेकिल्ला राखलेले विद्यमान आमदार चिंतेत आहेत. नवीन कार्यकर्त्यांत मात्र संधी मिळणार असल्याने उत्सुकता आहे.
गेल्या २५ वर्षांपासून भाजप व शिवसेनेची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची १५ वर्षांपासून आघाडी होती. केंद्र, राज्य शासनापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आघाडी व युती होती. पुण्यातील लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत युती व आघाडी होती. त्यामुळे गेल्या काही वर्षांत चारही पक्षांची प्रत्येक मतदारसंघात ताकद वाढण्यास मर्यादा होत्या. ती खदखद प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला होती. पुण्यातील विधानसभेच्या आठ जागांपैकी प्रत्येकी चार जागा शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वाट्याला होत्या. त्यामुळे उर्वरित चार मतदारसंघांत प्रत्येक पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांवर अन्याय होत होता.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला सर्वच विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. त्यामुळे भाजपला सर्व जागा लढविण्याचा आत्मविश्वास असला तरी आघाडी तुटल्यामुळे विधानसभेची राजकीय समीकरणे पूर्ण बदलणार आहे. त्यामुळे शहरातील आठही मतदारसंघांतील विजयाची गणिते बदलणार असून, कोणाची किती ताकद आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)