पुजाऱ्यांचा खंडोबा गडावर ठिय्या
By Admin | Updated: March 26, 2015 23:04 IST2015-03-26T23:04:44+5:302015-03-26T23:04:44+5:30
जेजुरी देवाचे दान आता न्यासाच्या खात्यात, अशा बातम्या वर्तमानपत्रांतून आल्याने येथील पुजारीवर्गात मोठी खळबळ उडाली.

पुजाऱ्यांचा खंडोबा गडावर ठिय्या
जेजुरी : जेजुरी देवाचे दान आता न्यासाच्या खात्यात, अशा बातम्या वर्तमानपत्रांतून आल्याने येथील पुजारीवर्गात मोठी खळबळ उडाली. आज सकाळी ११ वाजता त्यांनी आक्रमक पवित्रा घेत खंडोबा गडावर महिला-पुरुषांसह जाऊन ठिय्या मांडला. मात्र तहसीलदारांनी त्यांना आदेशासंबंधी माहिती देऊन समज दिली.
तीर्थक्षेत्र जेजुरीच्या मार्तंड देव संस्थान आणि येथील पुजारी सेवकवर्ग यांच्यात १९७१ पासून उत्पन्नावरून वाद सुरू होता. देवासमोरील जमा होणारे आणि दान पेटीतील सर्व उत्पन्न पुजारी, गुरव घेत असल्याने देव संस्थानला ते उत्पन्न मिळत नव्हते. दरम्यान, गेल्या ८ मार्च २०१५ रोजी सहायक धर्मादाय आयुक्त एन.व्ही. जगताप यांनी जेजुरीस भेट देऊन अहवाल सादर केला होता.
अहवालानुसार देवस्थानचे पुजारी, गुरव व हक्कदार यांना हे उत्पन्न घेता येणार नसल्याचे आदेश बुधवारी सहायक धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले. पुरंदरच्या तहसीलदारांनी आज २६ मार्चपासून त्यांना मनाई करावी. तसेच जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार ५०- ५० टक्के उत्पन्नाची विभागणी करण्यास तयार असतील तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याची विभागणी करावी असे स्पष्ट केले होते.
दुपारी २ वाजता पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात पुजारी, सेवकवर्गाला बोलावून त्यांना आदेशासंबंधी
माहिती दिली.
या वेळी जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके, मार्र्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, विश्वस्त अॅड. दशरथ घोरपडे, सुधीर गोडसे, तसेच नगरसेवक जयदीप बारभाई, अमोल सातभाई, माजी विश्वस्त सुनील असवलीकर, नितीन बारभाई, बाळासाहेब बारभाई, महेश आगलावे, रवींद्र बारभाई, बाळासाहेब सातभाई, सतीश कदम, दिलीप मोरे, आदी पुजारी सेवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आदेशानुसार आज पासूनच अंमलबजावणी करावी लागणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
या चर्चेत पुजारीवर्गाने जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार ५०-५० टक्के उत्पन्नाची विभागणी करण्यास मान्यता दिली. (वार्ताहर)
येत्या शनिवारी (दि. २८) देवासमोर देव संस्थानची अधिकृत दानपेटी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आयुक्त कार्यालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आजपासूनच करण्यात येत आहे.
- संजय पाटील,
तहसीलदार