प्रकाशकांनी कल्पक मार्गाने वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST2021-09-06T04:13:28+5:302021-09-06T04:13:28+5:30
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार, तर ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना साहित्यसेवा ...

प्रकाशकांनी कल्पक मार्गाने वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार, तर ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती आणि दिवाळी अंक पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी मनोहर मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष दत्तात्रय पाष्टे उपस्थित होते. प्रभावळकर यांनी माजगावकरांना मुलाखतीतून बोलते केले. प्रकाशन व्यवसायातील प्रवास, लेखकांच्या भेटीगाठी, वितरण व्यवस्था, विविध प्रकल्प यावर भाष्य करतानाच त्यांनी श्री. ग. माजगावकर, श्री. पु. भागवत यांच्या आठवणींना उजाळा दिला.
माजगावकर म्हणाले, ‘गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये आपल्या आयुष्यात समाजमाध्यमांची लक्षणीय पकड निर्माण झाली आहे. कोणत्याही माध्यमामध्ये जे सकस, टिकाऊ, जीवनदर्शन घडवणारे असेल तर ते लिखाण काळाच्या कसोटीवर टिकतेच. प्रकाशकांनाही सोशल मीडियातून नवे लेखक मिळतात. लेखन ही गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे. इतर कलांप्रमाणे लेखनासाठीही रियाझ आवश्यक असतो. मेहनत घेतली नाही तर साहित्य तात्कालिक ठरते.’
--------------
कसे लिहायचे, भाषा कशी असावी, संदर्भ कसे शोधावेत, हे मला श्री. ग. माजगावकरंनी शिकवले. आकाशवाणीवर दुर्गाबाईंची मुलाखत घ्यायची होती. सुरुवातीला त्या तयार नव्हत्या. त्यानंतर प्रतिभाने मुलाखत घेतली तरच मी देईन, असे म्हणाल्या. मुलाखत झाल्यानंतर लिखाणासाठी दिलीप माजगावकर यांनी प्रेरणा दिली. कायम लिहिण्याचे प्रोत्साहन दिले.
- प्रतिभा रानडे
-------------------------
लेखक आणि प्रकाशकांमधील संबंध पूर्वीसारखे निखळ राहिलेले नाहीत. त्यांच्यातील वैचारिक मतभेदांचे मनभेदांमध्ये कधीच रूपांतर झाले नाही. निखळ संबंधांची परंपरा साहित्य व्यवहारात आता क्षीण होत चालली आहे. साहित्याच्या क्षेत्रातून कोत्या मनोवृत्तीला छेद द्यायला हवा.
- प्रा. मिलिंद जोशी
--------------------------------
दिलीप माजगावकर हे संपादक, लेखक, रसिक, प्रकाशक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. माझी श्रुतिकांची मालिका गाजली. मात्र, श्रुतिकांचे पुस्तक कोणी विकत घेत नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्या कथा तयार करा, असे माजगावकरांनी सांगितले. त्यानुसार मी लेखन केले आणि ‘बोक्या सातबंडे’चा जन्म झाला.
- दिलीप प्रभावळकर