प्रकाशनाचा अनोखा ‘बुक टे्रलर...’
By Admin | Updated: February 17, 2017 05:11 IST2017-02-17T05:11:36+5:302017-02-17T05:11:36+5:30
रंगमंचावरील नेपथ्य, कार्यक्रमाला एका सूत्रात बांधणारा संचालक, तीन अतिथिगण, नाट्यरूपांतर, अभिवाचन आणि बरेच काही..!

प्रकाशनाचा अनोखा ‘बुक टे्रलर...’
पुणे : रंगमंचावरील नेपथ्य, कार्यक्रमाला एका सूत्रात बांधणारा संचालक, तीन अतिथिगण, नाट्यरूपांतर, अभिवाचन आणि बरेच काही..! हे वर्णन एखाद्या नाट्याविष्कार किंवा अभिवाचनाचे आहे, असे वाटू शकते! मात्र, साचेबद्ध चौकटीतील प्रकाशन सोहळ्यांना बगल देत लेखक वसंत लिमये यांनी ‘बुक टे्रलर’ ही अभिनव संकल्पना पुढे आणली आहे. एका संचिताच्या शोधप्रयत्नातून अस्मिता, सांस्कृतिक आदिबंध यांची आठवण करून देणाऱ्या त्यांच्या ‘विश्वस्त’ या कादंबरीचा चित्तथरारक प्रवास ‘बुक ट्रेलर’ या अभिनव प्रयोगातून रविवारी (दि. १९) उलगडणार आहे.
कोणत्याही प्रकाशन सोहळ्याचा केंद्रबिंदू असायला हवी, ती ‘कादंबरी’. मात्र, या कार्यक्रमांमध्ये त्या पुस्तकाबद्दल फारसे बोलले न जाता उगाचच मान्यवरांकडून काही वेळा पाल्हाळ लावला जातो किंवा टीका तरी केली जाते व तो कार्यक्रम कंटाळवाणा ठरतो. ‘कादंबरी’ ही पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाची ‘हिरॉईन’ आहे. तिचे रंगरूप, तिची जडणघडण या गोष्टी समोर यायला हव्यात. यासाठी लिमये यांनी ही अभिनव संकल्पना आणली आहे.
‘विश्वस्त’ कादंबरीच्या सूत्राबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘‘संस्कृतीचा विश्वस्त आणि वारसदार अशा दोन ध्रुवांची ताणलेली ही शोधयात्रा आहे. ‘जस्ट फॉर किक्स’ अशा गमतीशीर नावाचा पुण्यातील कॉफी हाऊसमध्ये जमणारा पाच जणांचा ग्रुप. ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणे, हा त्यांचा ध्यास आहे. कादंबरीत स्थळकाळाचा संदर्भ तोडलेले प्रसंग येतात. मग त्यामध्ये महाभारत, श्रीकृष्णाचा अंत:समय, चाणक्य, विष्णुगुप्त, चंद्रगुप्त यांच्याशी आपली भेट, सोमनाथाची लूट, गझनी महंमद, वजीर कासिम यांच्यासह गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भेट होते आणि कादंबरी रंगत जाते.’’