Publication of book 'PandePuran', 'Piyush Pandey' from Dilkhulas Chat | दिलखुलास गप्पांमधून उलगडले ‘पांडेपुराण’, पियूष पांडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
दिलखुलास गप्पांमधून उलगडले ‘पांडेपुराण’, पियूष पांडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : सर्जनशील व्यक्तींचा सहवास आणि वाचनाची आवड यातून झालेले ग्रूमिंग... ‘कुछ मीठा हो जाये’, ‘पप्पू पास हो गया’ अशा ‘कॅची’ वाक्यांमधून मनावर कोरल्या गेलेल्या जाहिराती... कल्पनेचे मूळ कायम धरून जाहिरात क्षेत्रात घेतलेली झेप... नरेंद्र मोदींबरोबर केलेली कॅम्पेन... अमिताभ बच्चन यांच्यासह केलेल्या सामाजिक विषयांवरील जाहिराती... उत्पादन ते ब्रँड असा प्रवास, अशा अनेक आठवणींना उजाळा देत प्रसिद्ध जाहिरातींमागचे किमयागार आणि अ‍ॅडगुरू पीयूष पांडे यांनी जाहिरात क्षेत्रातील प्रवासाचा पट उपस्थितांसमोर उलगडला. ‘करिअरचे नियोजन न करता आवडीचे काम करा. पाय कायम जमिनीवर राहू द्या,’ असा मूलमंत्रही दिला.
मनोविकास प्रकाशनातर्फे पीयूष पांडे यांच्या प्रसाद नामजोशी यांनी अनुवादित केलेल्या ‘पांडेपुराण : जाहिरात आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्योत्स्ना भोळे सभागृहात पार पडले. या वेळी पांडे यांच्यासह प्रसाद नामजोशी, अरविंद पाटकर, आशिष पाटकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सुधीर गाडगीळ यांनी साधलेल्या दिलखुलास संवादातून पीयूष पांडे यांचा प्रवास उपस्थितांना जाणून घेता आला. ‘आयुष्याकडून जितके मिळेल तितके घ्यावे. सकारात्मक विचार करावा, नैराश्य कधीही मदतीला येत नाही; त्यामुळे ते सोडून देणेच चांगले,’ अशा भावना व्यक्त करून त्यांनी आशावाद जागवला.
अरविंद पाटकर यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

पांडे म्हणाले, ‘‘सध्याचा जमाना सोशल मीडियाचा असला तरी त्याचा पाया छोटा आहे. आजही सामान्यांवर टीव्हीचे गारूड आहे. सोशल मीडियावर वावरण्याची प्रत्येकाला सवय लागली आहे. मात्र, इथे मी कशासाठी आहे, काय करणार आहे, याबाबत स्पष्टता असायला हवी. अनेक माध्यमे येतात आणि जातात. सर्जनशीलतेचे मूळ कायम असेल तर आपली घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. काळाप्रमाणे बदलण्याची तयारी ठेवायला हवी. हिºयाला पैलू पाडले जातात त्याप्रमाणे कल्पकता आणि सर्जनशीलतेचे विविध कंगोरे तपासून पाहता येतात.’’
‘माझा प्रेझेंटेशनवर विश्वास नाही, मी लोकांशी संवाद साधतो. सकारात्मक विचार केला, तर आयुष्यही सकारात्मक दिसू लागते. जीवनाला प्रेरणा देणारी वाक्ये, मनाला भावलेल्या भावना जाहिरातीत उतरवल्या. आयुष्यात भावनांना खूप महत्त्व असते. माणसाच्या भावना वैश्विक असतात. जाहिराती याही आयुष्याचाच एक भाग असताना त्या भावनारहित कशा असू शकतात?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘जाहिरात क्षेत्रात काम करताना क्लायंटला आपल्या कल्पना समजावून सांगण्याची तयारी असायला हवी. एका माणसाला आपली कल्पना समजावून सांगता येत नसेल तर ती लाखो लोकांपर्यंत कशा पोहोचणार? याचा विचार करायला हवा.’’

सही घेण्यासाठी वाचकांची झुंबड
पीयूष पांडे यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व, मिस्कील स्वभाव, हजरजबाबी उत्तरे यांतून श्रोतृवर्ग प्रभावित झाला होता. कार्यक्रमानंतर पुस्तकावर त्यांची सही घेण्यासाठी वाचकांची झुंबड उडाली होती. यामध्ये तरुण, महिला, आबालवृद्धांचा समावेश होता. पांडे यांनीही पुस्तकांवर सह्या करीत वाचकांशी दिलखुलास संवाद साधला.

राजकारण आणि धर्म कोणावरही थोपवता येत नाही. राजकारणात हरल्यानंतर शत्रूच निर्माण होतात,’ असा कानमंत्र गुरू डेव्हिड ओगिल्व्ही यांनी दिला होता. मीही राजकारणाशी संबंधित जाहिरात करायची नाही, हे धोरण अनेक वर्षे जपले. मात्र, नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गुजरात टुरिझम कँपेनचे काम करीत होतो. त्यांनी कायम माझे म्हणणे ऐकून घेतले, कल्पनांचा आदर करीत स्वातंत्र्य जपले. त्यामुळे मी माझ्या धोरणाला मुरड घालून भाजपासाठी जाहिरात करण्यास तयार झालो. पक्षाने केलेल्या संशोधनानुसार, पक्षापेक्षा मोदींची लोकप्रियता जास्त असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे जाहिरातीतही मोदींना केंद्रस्थानी ठेवण्यात आले. ते श्रेय माझे नसून, त्यांचे आहे.
- पीयूष पांडे, अ‍ॅडगुरू

अनुवाद हा स्वतंत्र साहित्यप्रकार आहे. अनुवाद करताना एका संस्कृतीचे दुसºया संस्कृतीत संक्रमण होत असते. पीयूष पांडे यांच्या सर्जनाच्या प्रक्रियेचा झंकार माझ्या मनात उमटवण्याचा मी प्रयत्न केला. त्यांच्या सर्जनाच्या सुगंधाने माझा हातही सुगंधित झाला. हा सर्जनशीलतेचा सुगंध अनेकांपर्यंत पोहोचून ही प्रक्रिया वृद्धिंगत व्हावी.
- प्रसाद नामजोशी, लेखक


Web Title: Publication of book 'PandePuran', 'Piyush Pandey' from Dilkhulas Chat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.