पं. रघुराज तुळशीबागवाले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:44+5:302021-01-08T04:26:44+5:30
पुणे : श्री रामजी संस्थान तुळशीबाग मंदिराचे विश्वस्त आणि ज्येष्ठ तबलावादक पं. रघुराज कचेश्वर ऊर्फ दादासाहेब तुळशीबागवाले (वय ८८) ...

पं. रघुराज तुळशीबागवाले यांचे निधन
पुणे : श्री रामजी संस्थान तुळशीबाग मंदिराचे विश्वस्त आणि ज्येष्ठ तबलावादक पं. रघुराज कचेश्वर ऊर्फ दादासाहेब तुळशीबागवाले (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
आजोबा आणि वडील कीर्तनकार असल्याने तुळशीबागवाले यांच्यावर अभिजात संगीताचे संस्कार झाले. पं. लक्ष्मणराव पर्वतकर आणि पं. रामकृष्णबुवा पर्वतकर यांच्याकडून त्यांनी तबलावादनाचे शिक्षण घेतले. उस्ताद अहमदजान थिरकवाँ आणि पं. सामता प्रसाद यांच्या तबलावादनाची शैली आत्मसात करण्यासाठी तुळशीबागवाले यांनी उस्ताद गुलाम रसूल खाँ, उस्ताद हबिबुद्दीन खाँ आणि पं. चतुरलाल यांच्याकडे गुरू-शिष्य परंपरेने तबल्याचे शिक्षण घेतले. दिल्ली येथे १९५५-५६ मध्ये घेण्यात आलेल्या ऑल इंडिया रेडिओ स्पर्धेत त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. बनारस, दिल्ली आणि फरूखाबाद घराण्यांच्या तबलावादनामध्ये प्रावीण्य संपादन करणारे कलाकार असा लौकिक त्यांनी प्राप्त केला होता.
एकल तबलावादनाबरोबरच तुळशीबागवाले यांनी डॉ. वसंतराव देशपांडे, गानहिरा हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा अशा ज्येष्ठ कलाकारांना तबलावादनाची साथ केली होती. पं. लालजी गोखले, पं. भाई गायतोंडे आणि पं. अनोखेलाल यांच्याशी त्यांचा स्नेह होता. गेली ४० वर्षे त्यांनी अनेक विद्यार्थ्याना मुक्तहस्ताने विद्यादान केले.
(फोटो - पंडित रघुराज तुळशीबागवाले नावाने हॅलो सिटीमध्ये आहे.)