पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मात्र, अर्जाबरोबर जोडावी लागणारी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे मिळण्यास अडचणी येत असल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे सहज उपलब्ध होतील यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी कॉप्स या विद्यार्थी संघटनेतर्फे केली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल विकसित केले आहे. त्यात उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचा समावेश केला आहे. परंतु, अद्यापही लाखो विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता पात्र असूनही अद्याप अर्ज केला नाही. तसेच अनेक महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांची माहिती व महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरावा? हेसुद्धा माहीत नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे नसल्यामुळे पात्र असूनही त्यांना शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करता आला नाही. त्यामुळे आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे विद्यार्थ्यांना तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवावे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शिष्यवृत्ती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयावर तत्काळ कारवाई करावी. तसेच शिष्यवृत्ती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक उच्च शिक्षण विभागातील सर्व ३ हजार १४१ महाविद्यालयांना व तंत्रशिक्षण विभागातील सर्व १ हजार ८०० महाविद्यालयांना पाठवावे, अशी मागणी कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी केली आहे.