पालिका सभेतही अणेंचा निषेध

By Admin | Updated: March 22, 2016 01:52 IST2016-03-22T01:52:13+5:302016-03-22T01:52:13+5:30

विदर्भाबरोबरच मराठवाडा स्वतंत्र करायला हवा, या राज्याच्या महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले

Protest against municipal council | पालिका सभेतही अणेंचा निषेध

पालिका सभेतही अणेंचा निषेध

पुणे : विदर्भाबरोबरच मराठवाडा स्वतंत्र करायला हवा, या राज्याच्या महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले. शिवसेनेने या विषयावर तहकुबी मांडली. या तहकुबीला भारतीय जनता पक्ष वगळता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसह सर्वांनी पाठिंबा दिला. भाजपच्या या विरोधाची सभेनंतर बरीच चर्चा झाली.
सभेचे कामकाज संपत असतानाच शिवसेनेच्या अशोक हरणावळ यांनी तहकुबीची सूचना मांडली. विदर्भासह मराठवाडाही स्वतंत्र करण्याचे अणे यांचे वक्तव्य महाराष्ट्रद्रोही आहे, याबद्दल ही सभा त्यांचा निषेध करीत आहे, अशी ही तहकुबी होती. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृह नेते बंडू केमसे ही तहकुबी घ्यायला सुरुवातीला तयार नव्हते; मात्र यात भाजपची कोंडी होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर लगेचच त्यांनी तसेच काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांनी ही तहकुबी स्वीकारत असल्याचे सांगितले व वाचनासाठी ती लगेचच नगरसचिवांकडे दिली.
नगरसचिव सुनील पारखी यांनी तहकुबीचे वाचन केले. नियमाप्रमाणे याला कोणाला विरोध आहे का म्हणून विचारणा केली. त्या वेळी सभागृहात भाजपचे गटनेते गणेश बीडकर किंवा ज्येष्ठ नगरसेवक अशोक येनपुरे यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे उपस्थित सदस्यांपैकी मुक्ता टिळक यांनी आपला याला विरोध आहे, असे म्हणत याच्यावर बोलायचे आहे, म्हणून मागणी केली. महापौर प्रशांत जगताप यांनी मतदान होऊ द्या, मग बोलायला संधी देतो, असे सांगितले. त्याप्रमाणे पारखी यांनी मतदान पुकारले.
तहकुबीच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे व सेना यांनी मतदान केले. एकट्या भाजपने विरोध केला. त्यांच्यातील धनंजय जाधव, श्रीनाथ भिमाले तसेच खुद्द मुक्ता टिळकही बराच वेळ विरोध करावा की नाही अशा संभ्रमात होते. मात्र, अखेरीस त्यांनी विरोध केला. ११ विरुद्ध ४० मतांनी ही तहकुबी मंजूर झाली. त्यानंतर मुक्ता टिळक बोलण्याची संधी घेत होत्या, मात्र महापौरच उठून उभे राहिल्यानंतर थेट राष्ट्रगीतच सुरू झाले. नंतर सेना, मनसेकडून भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणून बोल लावण्यात आले, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य ते पाहत उभे होते. (प्रतिनिधी)

Web Title: Protest against municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.