दरोडेखोरांच्या हल्ल्यात सुरक्षारक्षकाचा मृत्यू
By Admin | Updated: September 25, 2014 06:21 IST2014-09-25T06:21:45+5:302014-09-25T06:21:45+5:30
पुणे-आळंदी रस्त्यावरील चऱ्होली फाट्याजवळील व्यंकटेश बालाजी मंदिरातील पुजाऱ्याच्या घरावर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकून पाच ते सहा लाखाचा ऐवज लुटण्यात आला

दरोडेखोरांच्या हल्ल्यात सुरक्षारक्षकाचा मृत्यू
भोसरी : पुणे-आळंदी रस्त्यावरील चऱ्होली फाट्याजवळील व्यंकटेश बालाजी मंदिरातील पुजाऱ्याच्या घरावर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकून पाच ते सहा लाखाचा ऐवज लुटण्यात आला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात नामदेव भगवंत पवार (वय ५४, सध्या रा. शास्त्रीनगर, भोसरी, मूळ मु. पो. रेटवडी, ता. खेड, जि. पुणे) या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. तर पुजाऱ्यासह तिघेजण जखमी झाले.
चिरंतीलाल त्रिवेदी (वय ६८), मनोरमा त्रिवेदी (वय ६५, दोघेही रा. वडमुखवाडी, चऱ्होली) या वृद्ध दाम्पत्यासह तुकाराम काटे हे सुरक्षारक्षक दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. पोलीस निरीक्षक एन.के. घुगरे यांनी दिलेली माहिती अशी : पुणे-आळंदी रस्त्यावर चऱ्होलीजवळ व्यंकटेश बालाजी मंदिर आहे.
या मंदिरात पहाटे तीनच्या सुमारास दरोडेखोर पाठीमागील बाजुने शिरले. आत येत असताना पवार यांनी त्यांना हटकले असता दरोडेखोरांनी त्यांना लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मंदिराच्या समोरील बाजूच्या खोलीत खोलीत असलेल्या तुकाराम काटे यांना मारहाण करून त्याच खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील त्रिवेदी यांच्या खोलीचा दरवाजा तोडून तिजोरी उघडली. त्यातील एक मुकुट व देवाच्या पोशाखासह पुजाऱ्याच्या पत्नीचे पाच ते सहा लाखांचे दागिने चोरले. त्यानंतर त्रिवेदी दाम्पत्याला मारहाण दरोडेखार पसार झाले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना उपचारासाठी संत तुकारामनगर येथील पिंपरी चिंंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, पवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली असून अधिक तपास करीत आहेत. भगवान बालाजीसाठी एक पोशाख तयार करण्यात आला होता. त्याला कलाकुसर केली होती व
अमेरिकी डायमंड लावलेले
होते. त्याची अंदाजे किमत १० लाखांच्या आसपास आहे, अशी माहिती मंदिर प्रमुख डॉ. महेंद्र शर्मा यांनी सांगितले. (वार्ताहर)