खरिपातील पिकांना किडीपासून वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:14 IST2021-09-07T04:14:18+5:302021-09-07T04:14:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुरेसा पाऊस, पोषक हवामान यामुळे राज्याच्या सर्व भागांत खरिपातील पिकांना चांगली वाढ आहे. पिकांवर ...

खरिपातील पिकांना किडीपासून वाचवा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुरेसा पाऊस, पोषक हवामान यामुळे राज्याच्या सर्व भागांत खरिपातील पिकांना चांगली वाढ आहे. पिकांवर आता वेगवेगळी किड पसरण्याचा धोका असून त्यातून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्याच्या सर्व भागांत यंदा चांगला पाऊस झाला आहे. पेरलेली सर्व पिके आता वाढीच्या अवस्थेत आली आहेत. नेमक्या अशाच वेळी पिकांवर रोग पडण्याचा धोका असतो. त्यासाठी आधीपासूनच काळजी घ्यावी लागते. प्रामुख्याने पिकांची नियमीत पाहणी करणे गरजेचे असते.
सध्या भात फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पिक फुलोरा, शेंगा धरणे ते पक्वतेला आले आहेत. मूग व उडीदाला शेंगा धरायला लागल्या आहेत. बरेच आधी पेरलेले उडीद काढणीलाही आले आहे.
कापसाने फुलोरा धरला आहे. पाणी वेळेवर मिळत असलेला बागायती कापूस बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. भुईमूगालाही चांगला फुलोरा दिसायला लागला आहे. ज्वारी व बाजरीची कणसे आता भरू लागली आहेत. मका, सुर्यफुल, तीळ व कारळे ही पिके वाढीला आहेत.
एकूण पिक क्षेत्राच्या तुलनेत किडीचे प्रमाण कमी आहे, मात्र त्याकडे लक्ष दिले नाही तर संपूर्ण पीक खराब होण्याचा धोका असतो असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
लष्करी अळी, मावा तुडतुडे, अमेरिकन बोंड अळी, गुलाबी बोंड अळी, पांढरी माशी, सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा, उंट अळी, तंबाखूवर पाने खाणारी अळी, भातावर पिवळी खोडकिड, हुमणी किडीचा,तांबेरा असे रोग वेगवेगळ्या पिकांवर पडत असतात.
किडरोग व्यवस्थापनासाठी क्षेत्रिय स्तरावर शेतीशाळा, कृषि विद्यापीठांकडील पिक संरक्षण विभाग यांच्याकडून शेतकर्यांना विनामूल्य सल्ला देण्यात येतो. तसेच तालुका क्रुषी विभागाकडून फेरोमेन सापळे, ल्युर्सस यांचा ( दिवे लागणारे, आवाज करणारे सापळे) पुरवठा तसेच जैविक किटकनाशकांच्या वापराबाबतही कृषी विभागाकडून शेतकर्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे अशी कृषी विभागातून देण्यात आली.
* खरीप पिकांचे राज्यातील क्षेत्र (ऊस वगळून) १४१.९८ लाख हेक्टर
* पेरणी झालेले क्षेत्र १४१.४६ लाख हेक्टर