पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मालमत्ता कराची एप्रिल व मे २०२४ या दोन महिन्यांत १०० टक्के बिले देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र अनेक मालमत्ताधारकांना अद्याप बिलच मिळालेले नाही. त्यामुळे महापालिकेने छापलेली तब्बल ६ लाख बिले कोठे गेली? केवळ प्रतिबिलामागे २० रुपये वसूल करण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.महिला बचत गटांच्या माध्यमातून महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून घरोघरी, दुकाने व आस्थापनांवर जाऊन मालमत्ता कराची बिले वाटण्यात येतात. त्यासाठी एका बिलामागे महापालिका २० रुपये देत आहे. त्याकरिता महिलांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ९ महिने संपले तरी, अद्याप मालमत्ताधारकांना बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे नेमके किती बिल आहे, हे त्यांना समजले नाही. असे असताना करसंकलन विभागाकडून दररोज एसएमएसचा मारा केला जात आहे.मालमत्ताधारकांच्या मोबाइलवर ‘बिल भरा, विलंब दंड टाळा, बिल न भरल्यास जप्तीपूर्व नोटीस दिली जाईल. मालमत्ता जप्त केली जाईल,’ असे संदेश येत आहेत; मात्र हातात बिल नसल्याने ते नागरिकांना भरता येत नाही. या संदर्भात तक्रारी करूनही त्यांना बिले दिली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
वाल्हेकरवाडी-चिंचवडेनगर परिसरातील घरांना अद्याप मालमत्ता कराची बिले मिळालेली नाहीत. तसेच, गेली अनेक वर्षे मला घरी बिल आलेले नाही. त्यामुळे मला किती मालमत्ता कर भरायचा आहे, हे समजले नाही. त्यासंदर्भात मी संबंधित विभागीय कार्यालयाकडे तक्रार केली आहे. मात्र, त्याची कोणी दखल घेत नाही. - दिनकर पाटील, नागरिकघरी बिल आले नसेल तर, मालमत्तेचा मिळकत कर क्रमांक माहीत असल्यास महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन लगेच बिल उपलब्ध होते. ऑनलाइन बिल भरणे सुलभ व सुरक्षित आहे. बिल भरल्यानंतर एसएमएस येत असतील, तर त्याची तपासणी करू. अपवादात्मक परिस्थितीत असे होत असेल. एकाच वेळी बल्कमध्ये एसएमएस पाठविले जात असल्याने असे होत असेल. - अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका