संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे प्रोत्साहन
By Admin | Updated: February 3, 2015 01:00 IST2015-02-03T01:00:27+5:302015-02-03T01:00:27+5:30
राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुढाकार घेणार आहे.
संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे प्रोत्साहन
पुणे : राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुढाकार घेणार आहे. त्याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली.
नागपूर येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय नवव्या आविष्कार संशोधन स्पर्धेत विद्यापीठाने सातव्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. संशोधन प्रकल्पांसाठी विद्यापीठातील विविध शाखांतील ८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून, ६ विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना दुसरा क्रमांक मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना राज्यपाल कार्यालयाकडून विशेष शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच, एखादा प्रकल्प सर्जनशील असल्यास त्याला पेटंटसाठी विद्यापीठाकडून मदत केली जाईल. आविष्कार स्पर्धेनंतर दर वर्षी साधारणपणे हीच प्रक्रिया राबविली जाते.
विद्यापीठाने स्पर्धेत क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रकल्पांची सविस्तर माहिती मागविली आहे. या माहितीच्या आधारे संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने संशोधनात प्रोत्साहन देण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असून, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर त्यावर अखेरचा हात फिरविला जाणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)
४आविष्कार स्पर्धेत प्रकल्प सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधनासाठी किंवा नावीन्यपूर्ण प्रकल्पाला प्रत्यक्ष सामाजिक जीवनात आणण्यासाठी फारसा वाव मिळत नाही.
४त्यामुळे अनेक चांगले प्रकल्प स्पर्धेच्या पातळीपर्यंतच सीमित राहतात. त्यांत गुणवत्ता असूनही योग्य व्यासपीठ न मिळाल्याने ते प्रत्यक्षात येत नाहीत.
४या सर्व गोष्टींचा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यासाठी पुढाकार घेतला आहे.