प्रचार करा फक्त उपनगरांत
By Admin | Updated: January 28, 2017 01:59 IST2017-01-28T01:59:12+5:302017-01-28T01:59:12+5:30
महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभांसाठी प्रशासनाने पालिकेच्या मालकीच्या २९४ जागांची यादी शुक्रवारी संकेतस्थळावर जाहीर केली.

प्रचार करा फक्त उपनगरांत
पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभांसाठी प्रशासनाने पालिकेच्या मालकीच्या २९४ जागांची यादी शुक्रवारी संकेतस्थळावर जाहीर केली. मात्र, या यादीमध्ये आंबेगाव, कोंढवा, वडगावशेरी, बावधन, पाषाण या उपनगरांमधीलच जागांचा प्रामुख्याने समावेश असून, मध्यवस्तीमधील एकाही जागेचा समावेश नाही. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी चौकांमध्ये कॉर्नर सभा घेण्याशिवाय उमेदवारांकडे पर्याय उपलब्ध नसेल.
प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांना प्रचारसभांसाठी जागेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. शाळा प्रशासनाकडून प्रचारसभांसाठी जागा दिल्या
जात नाहीत. चौकांमध्ये सभा घेतल्यास वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे उपलब्ध असलेल्या मोजक्या जागा मिळविण्यासाठी उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा लागते. त्यातून वादावादीचे प्रसंग निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर, पालिका प्रशासनाकडून प्रचारसभांसाठी पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांची यादी जाहीर केली आहे. पालिकेला अॅमेनिटी स्पेस म्हणून मिळालेल्या मोकळ्या जागा यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शहरातील अनेक प्रभागांमध्ये चौकाचौकांत कॉर्नर सभा घेण्याशिवाय उमेदवारांकडे
आता पर्याय नाही. चौकांमध्ये प्रचारसभा घ्यायची असल्यास त्यासाठी वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सभांसाठी जागा मिळविण्याकरिता उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
(प्रतिनिधी)