जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाला जाळले
By Admin | Updated: September 22, 2015 03:03 IST2015-09-22T03:03:46+5:302015-09-22T03:03:46+5:30
जमीनवाटपाचा वाद झाल्यामुळे सख्ख्या भावालाच जाळल्याची भीषण घटना संविदणे (ता. शिरूर) येथे घडली आहे. सुरेश सोमा मोटे (वय ५५) यांचा खून करून त्याच्या भावानेच घरासमोर जाळले.

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाला जाळले
टाकळी हाजी : जमीनवाटपाचा वाद झाल्यामुळे सख्ख्या भावालाच जाळल्याची भीषण घटना संविदणे (ता. शिरूर) येथे घडली आहे. सुरेश सोमा मोटे (वय ५५) यांचा खून करून त्याच्या भावानेच घरासमोर जाळले.
शिरूरचे पोलीस निरीक्षक नारायण निंबाळकर व उपनिरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री १२च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सख्ख्या भावासह त्यांची मुले व नातेवाइकांसह आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपी फरार आहेत. नाथू सोमा मोटे (भाऊ) वय ५५, सचिन नाथू मोटे (२७), आशिष नाथू मोटे (२३), योगेश शिवाजी मोटे (२२), सुखदेव नाना मोटे (५५), कमल नाथू मोटे, योगश शिवाजी मोटे, रंजना शिवाजी मोटे, सुनंदा बाबाजी लंघे (सर्व रा. संविदणे) अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत. अभिमन्यू सुरेश मोटे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाथू, सुरेश व शिवाजी मोटे हे तीन भाऊ होते. यांच्यामध्ये पावणेदोन एकर जमिनीवरून सारखे वाद होत होते. सुरेश यांनी याबाबत पोलिसांत तक्रारदेखील केली होती. त्यांची आई झुंबराबाई हिने तिच्या नावावरची जमीन सुरेशला दिली म्हणून नाथू व शिवाजीच्या मुलांना सुरेशचा राग होता. रात्री सुरेश मोटे हे घराबाहेर एकटे झोपले होते. त्यांना एक मुलगी व एक मुलगा असून, ते नव्यानेच पोलीस दलात दाखल झाले आहेत. ते नाशिक येथे कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताला असल्यामुळे सुरेशची पत्नी गंगूबाई मुलांकडे नाशिकला गेली होती. त्यामुळे मयत सुरेश हे एकटेच घरी होते. झोपेतच त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ठार मारल्यावर घरासमोरच त्यांना पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.
सकाळी ८ च्या सुमारास शेजारील वस्तीवरील तरुण सुनील पोपट शिंदे हे शेताकडे जात असताना त्यांनी मृतदेह जळत असल्याचे पाहिले व ते सुरेश यांच्या घराकडे गेले. त्या वेळी
मृतदेह अर्ध्यापेक्षा जास्त जळून गेला होता. शिरूरचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, रामदास वाकोडे घटनास्थळी दाखल होऊन, पंचनामा केला. (वार्ताहर)