आचारसंहिता लांबणीवर, इच्छुकांचा जीव टांगणीला
By Admin | Updated: September 11, 2014 04:23 IST2014-09-11T04:23:30+5:302014-09-11T04:23:30+5:30
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच आचारसंहिता लागू होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागणा
आचारसंहिता लांबणीवर, इच्छुकांचा जीव टांगणीला
पिंपरी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच आचारसंहिता लागू होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागणार, हे स्पष्ट झाले. त्यामुळे सहा महिनेआधी निवडणुकीचीतयारी सुरू करून कार्यकर्त्यांवर, कार्यक्रमांवर खर्चाची उधळपट्टी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मनाची उलघाल सुरू झाली आहे. आचारसंहिता लांबणीवर पडल्यास कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा खर्च वाढत जाणार या भीतीने लवकर आचारसंहिता लागू व्हावी, अशी काहींची अपेक्षा आहे. तर ज्यांनी प्रमुख पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे, त्यांना आचारसंहिता लागू होण्यास विलंब व्हावा, असे वाटते आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी ज्या इच्छुकांनी लवकर तयारी सुरू केली, त्यांना आतापर्यंत दहीहंडी, गणेशोत्सव या उत्सवांच्या निमित्ताने विविध मंडळांच्या वर्गणीच्या पावत्या फाडणे भाग पडले आहे. मतदारसंघात संपर्क वाढविण्यासाठी विविध मंडळे, संघटना यांच्या सहकार्याने विविध उपक्रम घ्यावे लागले आहेत. त्या उपक्रमांवर, कार्यक्रमांवर इच्छुकांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. राजकीय पक्षांची उमेदवारी मिळावी, यासाठी नेत्यांकडे, पक्षश्रेष्ठींकडे खेटे मारण्यात लाखो रुपये खर्ची घातले आहेत. (प्रतिनिधी)