पुरोगामी विचारांचा भारतभर प्रसार पुण्यातूनच
By Admin | Updated: March 16, 2017 01:47 IST2017-03-16T01:47:28+5:302017-03-16T01:47:28+5:30
पुणे शहर समाजकारण आणि राजकारणाबाबत देशात आघाडीवर आहे. पेशवाई असलेल्या सनातनी पुण्यात निर्माण झालेल्या क्रांतिबीजाचा, समाजकारणाचा विचार करावा लागेल

पुरोगामी विचारांचा भारतभर प्रसार पुण्यातूनच
पुणे शहर समाजकारण आणि राजकारणाबाबत देशात आघाडीवर आहे. पेशवाई असलेल्या सनातनी पुण्यात निर्माण झालेल्या क्रांतिबीजाचा, समाजकारणाचा विचार करावा लागेल, असे सांगून वैद्य म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांचा विचार त्यादृष्टीने मोलाचा आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांच्या ‘शतपत्रे’मधून अंधश्रद्धा, विकृत रूढी-रिवाज यांच्यावर कठोर हल्ले केले. महात्मा फुले यांनी केवळ विचार न मांडता कृतीतून सामाजिक सुधारणा केल्या. या सुधारणांना तेव्हा प्रचंड चालना मिळाली.
१८४८मध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा याच पुण्यात सुरू केली. ती भारतीयांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा. सावित्रीबाई फुले यांना शिकवून मुलींना शिकविण्यासाठी तयार केले.
त्या पहिल्या महिला शिक्षिका
आहेत. फातिमाबी शेख यांनाही शैक्षणिक चळवळीत त्यांनी ओढून घेतले.’’
भाई वैद्य म्हणाले, ‘‘आज देशात करोडो स्त्रिया शिकल्या. फार महत्त्वाच्या पदांवर काम करू लागल्या. बँका, वायुदल, लष्कर, राजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्या चमक दाखवीत आहेत. सुधारणेची इतकी मोलाची बीजे जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी रोवली. ते एवढेच करून थांबले नाहीत, तर १८५१मध्ये पददलितांसाठी शाळा सुरू करून त्यांनी सनातन्यांचा रोष ओढवून घेतला.
चातुर्वर्ण्य निर्माण करून ब्राह्मणांनी विकृत रूढी-रिवाज निर्माण केले, याबद्दल बहुजन समाज जाब विचारू लागला. कालांतराने फुले यांचा विचार देशभर पोहोचला. अनेक राज्यांमध्ये त्यांचे वाङ्मय गेले. त्यांचे पुतळे उभारले गेले. त्यांच्या प्रभावामुळे बहुजन समाजातून अनेक नेते निर्माण झाले. शाहूमहाराज यांच्यावरही त्यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीला जोर चढला. या चळवळीचे पुणे हे केंद्र होते. जेधे बंधू यांच्या जेधे मॅन्शनमध्ये हे केंद्र कार्यान्वित होते.
शाहूमहाराज यांच्या प्रभावामुळे सामाजिक सुधारणांना अधिक चालना मिळाली.’’
भाई वैद्य म्हणाले, ‘‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यताविरोधी चळवळ गतिमान केली. १९०६मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशन सुरू करून शिंदे स्वत: दलित वस्तीमध्ये राहिले. १९१७मध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावरून त्यांनी अस्पृश्यताविरोधी जाहीरनामा प्रकट केला. काँग्रेसच्या नेत्यांच्या त्यावर सह्या होत्या. त्यांचे कार्य पुणे शहरात असले, तरी देशभर त्याचा प्रभाव निर्माण झाला. या विविध प्रयत्नांमुळे पुणे शहर सामाजिक सुधारणांबाबत आघाडीवर राहिले.
पेशवाईच्या पार्श्वभूमीवरच्या शैक्षणिक, समतेच्या चळवळी अत्यंत परिणामकारक ठरल्या. स्त्रिया, दलित आणि एकूणच बहुजन सक्रिय पद्धतीने या चळवळींमध्ये सहभागी झाला. पर्वतीवरच्या मंदिरातील दलितांच्या प्रवेशाची चळवळ एस. एम. जोशी, शिवराम जानकू कांबळे यांनी सुरू केली. ‘भाला’कार भोपटकर यांनी त्यांना विरोध केला; मात्र सुधारकांनी त्यांना जुमानले नाही.’’
स्त्रियांच्या पुनर्विवाहाची चळवळ पुण्यातच सुरू झाली. मुस्लिम समाजात सुधारणा करण्यासाठी हमीद दलवाई यांनी याच पुण्यात
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून चळवळ सुरू केली. समान नागरी कायदा, तलाकविरोधी कायदा यांचा अंतर्भाव असलेल्या या चळवळीला आज जोर आला आहे. दलित समाजातील शिवराम जानकू कांबळे, न्यायमूर्ती भोळे, पां. ना. राजभोज असे नेते पुण्यात उदयास आले.’’