तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गरिबी नष्ट होईल
By Admin | Updated: February 11, 2017 02:55 IST2017-02-11T02:55:30+5:302017-02-11T02:55:30+5:30
तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने होत असून, पुढील १० ते १५ वर्षांत अन्न, वस्त्र, निवारा, वाहतूक आदी गोष्टींवर होणारा खर्च कमी होणार आहे.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गरिबी नष्ट होईल
पुणे : तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने होत असून, पुढील १० ते १५ वर्षांत अन्न, वस्त्र, निवारा, वाहतूक आदी गोष्टींवर होणारा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे देशातील गरिबी नष्ट होईल, असा विश्वास प्रसिद्ध उद्योजक
अरुण फिरोदिया यांनी शुक्रवारी व्यक्त केला. तसेच, समाजातील धर्म व जाती भेद मिटल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, असेही
त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात फिरोदिया बोलत होते.
या प्रसंगी ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चाफेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, राजा ढाले, विद्या बाळ, मोहनराव देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन एकबोटे, डॉ. पी. डी. पाटील, विश्वनाथ कराड यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, महाविद्यालये व विद्यापीठ मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, वित्त व लेखा अधिकारी विद्या गारगोटे आदी उपस्थित होते.
फिरोदिया म्हणाले, ‘‘समाजात आजही एकमेकांमध्ये वाद व दुरावा दिसून येतो. मात्र, तंत्रज्ञानाचा वेग कोणालाही थांबविता येणार नाही. परिणामी, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सामाजिक आणि आर्थिक स्थिरता येईल. त्यासाठी सर्वांनी तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे. तसेच, परदेशात जाऊन लोकांची चाकरी करण्यापेक्षा देशातच रोजगारनिर्मिती केली, तर देश वैभवाच्या शिखरावर जाईल.’’
बाबा आढाव म्हणाले, ‘‘विद्यापीठाने झोपडीत राहणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत ज्ञानाची ज्योत पोहोचविण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच, असंघटित कामगारांसाठी एक संस्था सुरू करायला हवी.’’
अलीकडे राष्ट्रद्रोह हे कलम खूप सोपे झाले आहे. आम्हालाही ते लावले जाऊ शकते, अशी टीका करून विद्या बाळ म्हणाल्या, ‘‘भेदाभेद पाडणाऱ्या संस्कृतीला बाजूला सारून विद्यापीठाने माणसाला माणूस म्हणून वागणूक देणारे शिक्षण देण्यावर भर द्यावा.’’
मनोहरराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. एकबोटे यांच्या वतीने डॉ. निवेदिता एकबोटे यांनी पुरस्कार स्वीकारला.
(प्रतिनिधी)