प्राध्यापकांचा आठवडा आता ४० तासांचा
By Admin | Updated: February 4, 2015 00:16 IST2015-02-04T00:16:24+5:302015-02-04T00:16:24+5:30
महाविद्यालय व विद्यापीठातील प्राध्यापकांना आता आठवड्यातील ४० तास कॉलेज कॅम्पसमध्ये थांबणे बंधनकारक असणार आहे.
प्राध्यापकांचा आठवडा आता ४० तासांचा
पुणे : महाविद्यालय व विद्यापीठातील प्राध्यापकांना आता आठवड्यातील ४० तास कॉलेज कॅम्पसमध्ये थांबणे बंधनकारक असणार आहे. तसेच या कालावधीत काय कामकाज केले जाणार, याचे वेळापत्रकही त्यांना प्राचार्यांना द्यावे
लागणार आहे. प्राध्यापकांनी महाविद्यालयांत किती तास शिकवावे, याबाबतचे धोरण विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरविलेले आहे. त्यानुसार प्राध्यापकाने आठवड्यातून १४ तास केवळ अध्यापनाचे काम करणे बंधनकारक आहे. प्राध्यापक जर संशोधन मार्गदर्शक असतील, तर त्यांना दोन तासांची सवलत देण्यात आलेली आहे. सहयोगी प्राध्यापकाने १४ तास, तर सहायक प्राध्यापकाने १६ तास शिकविणे बंधनकारक आहे. महाविद्यालयात अध्यापनाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे इतरही अनेक उपक्रम सुरू असतात. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक उपक्रम यांचा समावेश आहे. याशिवाय नॅकसह महाविद्यालयातील इतरही अनेक समित्यांचे कामकाज प्राध्यापकांना करावे लागते. या कामकाजाची बऱ्याचदा कोठेही नोंद होत नाही.
प्राध्यापकांना करावे लागणारे सर्व कामकाज लक्षात घेऊन त्यांचा आठवडा चाळीस तासांचा करण्यात आला आहे.
गत महिन्यात पुण्यात शिक्षण संचालक डॉ. धनराज माने व सहसंचालक डॉ. व्ही. आर. मोरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक होऊन तशी सूचना राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांना पाठविण्यात आली आहे.
त्यामुळे प्राध्यापकांना आता तासिकांसोबतच इतर उपक्रमांचेही वेळापत्रक तयार करावे लागणार आहे.
नागपूर येथील महालेखापालकांनी महाविद्यालयांचे आॅडिट केले आहे. यामध्ये आर्थिक बाबींसह शैक्षणिक कामकाजाचीही त्यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी विविध सूचना सरकारला केल्या आहेत. त्याचाही आधार या नवीन निर्णयासाठी घेण्यात आला आहे.
४सध्या प्राध्यापकांना दररोज पाच तास महाविद्यालयात थांबावे लागते. त्यासाठी बहुतांश महाविद्यालयात बायोमेट्रिक मशिन्स बसविण्यात आली आहेत.
४नवीन धोरणामुळे प्राध्यापकांना दररोज साधारण साडेसहा तास महाविद्यालयात थांबावे लागणार आहे.