आयएसएमटी कंपनीचे उत्पादन सुरू होणार
By Admin | Updated: August 6, 2015 03:44 IST2015-08-06T03:44:37+5:302015-08-06T03:44:37+5:30
एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीने अखेर शुक्रवारपासून (दि. ७) उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ४२४ कामगारांवरील टांगती तलवार

आयएसएमटी कंपनीचे उत्पादन सुरू होणार
बारामती :एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीने अखेर शुक्रवारपासून (दि. ७) उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ४२४ कामगारांवरील टांगती तलवार दूर झाली आहे. मात्र, व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये याबाबत स्वतंत्र करार करण्यात आला आहे.
१२ जुलैपासून कंपनीने उत्पादन बंद ठेवले होते. तेव्हापासून कंपनीच्या कामगारांना प्रवेश नाकारण्यात आला होता. गेल्या २३ दिवसांपासून ४२४ कामगार या निर्णयामुळे कंपनीच्या प्रवेशद्वारावर बसून होते. व्यवस्थापन आणि कामगारांच्या झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या होत्या. कामगार आयुक्तांनी याबाबत तोडगा काढण्याची सूचना व्यवस्थापनाला केली होती. व्यवस्थापनाने सुरुवातीपासून सकारात्मक, तर कामगारांनी तणावाच्या परिस्थितीतदेखील संयमाची भूमिका घेतली.
परिसरातील कामगार संघटनांनी आयएसएमटी कामगार संघटनेला पाठिंबा व्यक्त केला होता. कंपनी बंद करण्याचा निर्णय परिसरात चर्चेचा विषय झाला. मात्र, आता कामगारांचा प्रश्न मार्गी लागला आहे. व्यवस्थापन आणि कामगारांची नुकतीच बैठक पार पडली. त्यामध्ये व्यवस्थापनाने सर्वमान्य तोडगा काढला. सोमवारी (दि. ३) व्यवस्थापन आणि कामगारांच्यात चर्चा झाली. त्यामध्ये व्यवस्थापनाच्या वतीने मालक बी. आर. तनेजा, उपाध्यक्ष बलराम अग्रवाल, किशोर भारांबे आदींनी सहभाग घेतला. कामगार प्रतिनिधींच्या वतीने अध्यक्ष नाना भगत, सचिव गुरुदेव सरोदे यांनी सहभाग घेतला. या चर्चेत कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्चेनंतर सर्वमान्य करार करण्यात आला आहे.
कंपनीची मोडकळीस आलेली अवस्था असूनदेखील केवळ कामगारांची निष्ठा पाहून मालक बी. आर. तनेजा यांनी चांगला प्रतिसाद दिला. लवकरच कंपनी काही दिवसांत पूर्वपदावर येईल. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अॅड. आर. बी. शरमाळे यांची भूमिका हा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची ठरली, असे अध्यक्ष भगत यांनी सांगितले.
या वेळी उपाध्यक्ष बाळासाहेब आटोळे, संजय जांबले, ज्ञानदेव गाडे, सुहास शिंदे, कल्याण कदम, नामदेव गोरे, संतोष साळवे, उमाजी भिलारे, राजकुमार होळकर, गोपीचंद नवले, हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)