प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी मिळणार मोफत
By Admin | Updated: March 11, 2017 03:15 IST2017-03-11T03:15:08+5:302017-03-11T03:15:08+5:30
शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी बगीचा, रस्तेबांधणी, बांधकाम व वापरण्यासाठी टँकरद्वारे मोफत उपलब्ध करून देण्याची यंत्रणा पालिकेच्या वतीने

प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी मिळणार मोफत
- दीपक जाधव, पुणे
शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी बगीचा, रस्तेबांधणी, बांधकाम व वापरण्यासाठी टँकरद्वारे मोफत उपलब्ध करून देण्याची यंत्रणा पालिकेच्या वतीने उभारण्यात आली आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे सांडपाण्याचा पुनर्वापर होऊन पाण्याची मोठी बचत होणार आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा
पुनर्वापर करणारी पुणे महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे.
शहरामध्ये दररोज ७५० एमएलडी इतके सांडपाणी तयार होते,
त्यापैकी ४५० एमएलडी इतक्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा नदीत सोडले जाते. त्याऐवजी या सांडपाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची बचत करण्याचा आराखडा पालिकेच्यावतीने तयार करण्यात आला आहे. बगीचा, रस्तेबांधणी, बांधकाम यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. त्याऐवजी त्यासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यास सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे. वाचविलेले हे पाणी नागरिकांसाठी तसेच शेतीसाठी वापरता येणार आहे. मुख्य म्हणजे सांडपाण्याचा पुनर्वापर होत असल्याने नदीचे प्रदूषण टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
शहरामध्ये सध्या ९ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित आहेत. बोपोडी (१८ एमएलडी), एरंडवणा (५० एमएलडी), नवीन नायडू (११५ एमएलडी), विठ्ठलवाडी (३२ एमएलडी), बाणेर (३० एमएलडी), खराडी (४० एमएलडी), तानाजीवाडी (१७ एमएलडी), तोफखाना (४५ एमएलडी), नवीन कसबा (१६० एमएलडी) अशी या
प्रकल्पांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. यापैकी भैरोबा
नाला, विठ्ठलवाडी, बोपोडी,
बाणेर, खराडी, नायडू आदी केंद्रांवर शुद्ध केलेले सांडपाणी उपलब्ध
करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्याचबरोबर येत्या १५ दिवसांमध्ये पालिकेला सांडपाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र टँकर उपलब्ध होणार आहे.
जायका कार्यान्वित झाल्यास मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार पाणी
शहरात लवकर एक हजार कोटी रुपये खर्च करून नदीसुधारणेचा जायका प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. याअंतर्गत सांडपाणी शुद्धीकरणाचे मोठ्या क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यानंतर आणखी मोठ्या प्रमाणात नागरिकांना वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.
पुनर्वापरामुळे पाण्याची मोठी बचत
शहरातील महापालिकेची व खासगी उद्याने, रस्तेबांधणी, बांधकामे यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. यासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याच्या चांगल्या उपक्रमास सुरुवात झाल्यानंतर पाण्याची मोेठी बचत होणार आहे.
पाश्चात्त्य देशांमध्ये मैलापाण्यांवर प्रक्रिया करून ते पिण्याइतपत योग्य बनविले जाते. आपल्याकडे सध्या प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्यासाठी सुरुवात केली जात असल्याने भविष्यातील पाणी बचतीचे ते मोठे पाऊल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रक्रिया केलेले पाणी हवे असल्यास नागरिकांनी संपर्क करावा : नागरिकांना बगीचा, बांधकाम व वापरण्यासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी मोफत उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. ज्यांना त्याची आवश्यकता असेल त्यांनी महापालिकेच्या मैलापाणी शुद्धीकरण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी केले आहे.