सुट्या पैशांची समस्या : पेठ बाजारातून भाजीपाला पुन्हा माघारी

By Admin | Updated: November 17, 2016 01:54 IST2016-11-17T01:54:23+5:302016-11-17T01:54:23+5:30

सातगाव पठार भागातील एकमेव पेठ येथे दर बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराकडे ग्राहकांनी सुट्या पैशांअभावी पाठ फिरवली असल्याने बाजारात शुकशुकाटीचे वातावरण पाहावयास मिळत होते.

Problems with loose money: Vegetables turned back from Peth market | सुट्या पैशांची समस्या : पेठ बाजारातून भाजीपाला पुन्हा माघारी

सुट्या पैशांची समस्या : पेठ बाजारातून भाजीपाला पुन्हा माघारी

पेठ : सातगाव पठार भागातील एकमेव पेठ येथे दर बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराकडे ग्राहकांनी सुट्या पैशांअभावी पाठ फिरवली असल्याने बाजारात शुकशुकाटीचे वातावरण पाहावयास मिळत होते. बहुतांश विक्रेत्यांना आपला आणलेला भाजीपाला विक्री न झाल्याने परत घेऊन जावा लागला.
चलनातील पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांसह बाजारातील भाजी विक्रेत्यांनादेखील बसला. पेठ येथील आठवडे भाजी बाजारात ग्राहकांनी सुटे पैसे नसल्याने नेहमीप्रमाणे म्हणावी अशी गर्दी केली नाही. परिणामी, विक्रेत्यांचा माल विक्रीच झाला नाही. त्यामुळे व्यवहार ठप्प झाले असल्याचे भाजीविक्रेते सांगतात. बाजारात येणारा प्रत्येक ग्राहक पाचशे व हजारच्याच नोटा काढत होता. विक्रेत्यांकडेदेखील सुटे पैसे नसल्याने त्यांनादेखील माल विकता आला नाही.
शेतमालाच्या उत्पादनाला सध्या पोषक वातावरण असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे उत्पादन होत आहे. मात्र, सुट्या पैशांअभावी शेतमाल विकण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे भाजीबाजारात देखील शेतकरी, भाजीविक्रेते चिंताग्रस्त होऊन बसले असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.(वार्ताहर)

Web Title: Problems with loose money: Vegetables turned back from Peth market