लपणं कमी झाल्याने समस्या
By Admin | Updated: February 15, 2017 01:15 IST2017-02-15T01:15:55+5:302017-02-15T01:15:55+5:30
राजुरी परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे. लपण्यासाठी लपणं न राहिल्याने हे मानवीवस्तीवर येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत.

लपणं कमी झाल्याने समस्या
राजुरी : राजुरी परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे. लपण्यासाठी लपणं न राहिल्याने हे मानवीवस्तीवर येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. बोरी बुद्रुक, साळवाडी, जाधववाडी, वडगाव कांदळी, भोरवाडी, उंचखडक या परिसरात
उसाचे क्षेत्र असल्याने साहजिकच लपण्यासाठी चांगल्या प्रकारे जागा मिळत आहे. त्यातच उंचखडक-बांगरवाडीत जंगल असल्याने वावर वाढला आहे.
राजुरी परिसरातील विविध गावांमधील अनेक ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून दहा ते बारा शेळ्या ठार केलेल्या आहेत, तर सहा ते आठ गार्इंवरती हल्ला करून त्यांना ठार केलेले आहे. राजुरी येथे गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात वनखात्याने एक बिबट्या पकडला होता.
अजून चार ते पाच बिबटे या परिसरात असल्याचा अंदाज येत आहे. हे बिबटे रानात राहतात. परंतु, या बिबट्यांना खाण्यासाठी खाद्य मिळत नसल्याने हे बिबटे मानवीवस्तीमध्ये येऊ लागले आहेत व त्यांनी लपण्यासाठी उसाची जागा निवडली आहे. परंतु, सध्या उसतोडणी मोठ्या प्रमाणात उरकली असून या बिबट्यांना लपण न राहिल्याने हे बिबटे मानवी वस्तीवर येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागले आहेत. वनखात्याने या परिसरात बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.