नियोजनाअभावी पाण्यावाचून लोकांचे हाल

By Admin | Updated: May 25, 2016 04:40 IST2016-05-25T04:40:36+5:302016-05-25T04:40:36+5:30

तालुक्यातील टँकरग्रस्त १४ गावे आणि २८ वाड्यावस्त्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले होते. त्यांपैकी ३ गावे व १६ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३ टँकर, एक पिकअप

The problem of people without water | नियोजनाअभावी पाण्यावाचून लोकांचे हाल

नियोजनाअभावी पाण्यावाचून लोकांचे हाल

भोर : तालुक्यातील टँकरग्रस्त १४ गावे आणि २८ वाड्यावस्त्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले होते. त्यांपैकी ३ गावे व १६ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३ टँकर, एक पिकअप जीप मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काही ठिकाणी दोन-तीन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. तर, काही ठिकाणी विजेअभावी आठवडाभरापासून टँकर बंद आहे. नियोजनाअभावी पिण्याच्या पाण्यावाचून लोकांचे हाल सुरू आहेत.
भाटघर व नीरा-देवघर धरण भागातील व महुडे व वीसगाव खोऱ्यातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. १४ गावे २८ वाड्यावस्त्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे २ महिन्यांपूर्वीच सादर केले होते. ३ गावांचे व १० वाड्यावस्त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. सुमारे ३,५७८ लोकांसाठी माणशी २० लिटरप्रमाणे पाणीवाटप करण्यासाठी २ टँकर मंजूर करण्यात आले आहेत. सदर टँकरने त्यातील महुडे बुद्रुक गावातील दलितवस्ती, मातंगवस्ती, आखाडेवस्ती, भानुसदरा, हुंबेवस्ती, गोरेवस्ती यांना १२ हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरने दररोज ३ खेपा, तर पसुरेची धनगरवस्ती, तळजाईनगर, भुतोंडे, डेरे, गृहिणी, गुढेचे निवंगण, कळंबाचा माळ या गावांना व वाड्यावस्त्यांना १० हजार लिटर क्षमतेच्या एका टँकरने दररोज ३ खेपा करायच्या आहेत.
२० एप्रिल रोजीच जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर दुर्गाडी मानटवस्ती, रायरी धारांबेवाडी, अशिंपीची उंबार्डेवाडी, शिळींबची राजिवडी, शिरगाव पातरटकेवाडी, डेहेणची जळकेवाडी, सोनरवाडी, हुंबेवस्ती यांना २ टँकर मंजूर झाले असून, ४ टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, टँकर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दोन-तीन दिवसांतून टँकर जात आहे. तर, वीज नसल्याने कोंडगाव जळकेवाडी, सोनारवाडी, हुंबेवस्ती यांना ८ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे पाण्यावाचून नागरिकांसह जनावरांचे मोठे हाल होत आहेत. भोर तालुक्यातील नीरा-देवघर धरण भागातील हिर्डोशीची सोमजाईवस्ती, हरळीचा माळ, कोंडगाव चौधरीवस्ती, धानवली महादेववाडी, वरेवाडी, मिरकुटवाडी, कुडली बुद्रुक, साळुंगण, वारवंड या गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. तर बालवडी, कुडली कुर्द, वरोडी डायमुख, धनावडेवाडी, शेरताटी वरोडी बुद्रुक, ससेवाडी, माझेरी, कुरुंजी, वाढाणे या गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. नेरे, कोंडगाव हे प्रस्ताव परिपूर्ण आहेत. दुर्गाडी, वारवंड, शिरवली, हि. माची, चौधरीवस्ती अशा एकूण १४ गावे आणि २८ वाड्यावस्त्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले आहेत. यात नीरादेवघर धरण भागातील १२ वाड्या, भाटघर धरणभागातील २ गावे १० वाड्या तर वीसगाव खोऱ्यातील ४ गावे २ वाड्यावस्त्या, महुडे खोऱ्यातील ४ वाड्या तर महामार्गावरील एका गावाचा समावेश असून अजून टँकर मागणाऱ्या गावांची वाढ होऊ शकते.
टँकरचा ठेका सोनाई दूधवाहतूक संस्था इंदापूरला मिळाला आहे. मात्र, त्यांच्याकडून भोर तालुक्यातील ३ गावे १६ वाड्यावस्त्यांवरील ३,५५७ लोकांसाठी माणशी २० लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करायचा असून त्यासाठी १० हजार व १२ हजार लिटरचे दोन टँकरने पाणीपुरवठा करणार आहेत. मात्र, संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे टँकर निम्माच भरून जात आहे. भुतोंडे येथे दोन दिवसांपासून टँकर बंद आहे. तर, जळकेवाडी सोनारवाडी, हुंबेवस्ती आणि कोंडगाव येथे वीजपुरवठा खंडित असल्याने आठ दिवसापांसून पाणीपुरवठा बंद आहे. पाण्यावाचून हाल होत असल्याचे भगवान कंक यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: The problem of people without water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.