प्रभुत्व नसल्याने मराठी भाषेची अडचण
By Admin | Updated: January 14, 2017 03:12 IST2017-01-14T03:12:29+5:302017-01-14T03:12:29+5:30
‘‘मात्र, महाराष्ट्रात मराठी भाषेविषयी निश्चित असे धोरण नाही. तसेच इंग्रजी भाषेचा बाऊ केला व मराठीविषयी न्यूनगंड बाळगला

प्रभुत्व नसल्याने मराठी भाषेची अडचण
सासवड : ‘‘मात्र, महाराष्ट्रात मराठी भाषेविषयी निश्चित असे धोरण नाही. तसेच इंग्रजी भाषेचा बाऊ केला व मराठीविषयी न्यूनगंड बाळगला; त्यामुळे ती विकसित होऊ शकली नाही. मातृभाषेपेक्षा इतर भाषांना अधिक महत्त्व दिल्याने मराठीवरील प्रभुत्व कमी झाले आणि त्यामुळेच आपल्याच भाषेची अडचण कामकाजात जाणवत आहे,’’ अशी खंत प्रा. अरुण कोळेकर यांनी
व्यक्त केली.
सासवड (ता. पुरंदर) येथील सासवड न्यायालय आणि सासवड बार संघटना यांच्या वतीने न्यायालयीन कामकाजात ‘मराठी भाषेचा वापर’ याविषयी चर्चासत्र आयोजित कारण्यात आले होते, त्या वेळी प्रा. कोळेकर यांनी मराठी भाषेविषयी आपले विचार स्पष्ट केले. सासवड न्यायालयाचे मुख्य दिवाणी न्यायाधीश व्ही. के. जाधव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या प्रसंगी सहन्यायाधीश ए. आर. दिंडे, न्या. व्ही. बी. साळुंखे, बारचे अध्यक्ष अॅड. महेश बारटक्के, उपाध्यक्ष विशाल पोमण, तसेच बारचे पदाधिकारी व ज्येष्ठ आणि इतर वकील मंडळी उपस्थित होती. कोळेकर म्हणाले, ‘‘मराठी भाषेची अवस्था डोक्यावर सुवर्णमुकुट आणि अंगावर फाटकी वस्त्रे, अशी झाली आहे. तिला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केवळ न्यायसंस्थेने आदेश देण्याची गरज नाही, तर प्रत्येकाने तिचा जीवनात वापर करणे अनिवार्य आहे भाषेची रचना असते. साहित्य, शास्त्रीय, कथा-कादंबरी या क्षेत्रातील भाषा वेगवेगळी असते ती समजून घेणे गरजेचे आहे. त्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. पुस्तके, ग्रंथ आदी विकत घेऊन त्यांचे दैनंदिन वाचन केले पाहिजे. केवळ भाषणे ठोकून किंवा कायदे करून मराठी भाषा विकसित होणार नाही, तर त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने ती आत्मसात केली पाहिजे, अशी अपेक्षा प्रा. कोळेकर यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)