खराडी रुग्णालयाचे अखेर खासगीकरण
By Admin | Updated: August 20, 2014 00:15 IST2014-08-20T00:15:18+5:302014-08-20T00:15:18+5:30
महापालिकेस आर 7 अंतर्गत ताब्यात मिळालेल्या खराडी हॉस्पिटलच्या खासगीकरणाच्या फेरविचाराचा प्रस्ताव आज स्थायी समितीत फेटाळण्यात आला.

खराडी रुग्णालयाचे अखेर खासगीकरण
पुणो : महापालिकेस आर 7 अंतर्गत ताब्यात मिळालेल्या खराडी हॉस्पिटलच्या खासगीकरणाच्या फेरविचाराचा प्रस्ताव आज स्थायी समितीत फेटाळण्यात आला. या प्रस्तावास शिवसेना, भाजपाने आणि मनसेने विरोध केल्यानंतर सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सभासदांनी आठ विरोधात सात मतांनी हा फेरविचाराचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला आहे. स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णेगुरुजी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, सत्ताधारी पक्षाने घेतलेल्या या निर्णयाला रिपाइंचे पालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी विरोध केला असून, सर्वसाधारण सभेत या विषयाला विरोध केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील आठवडय़ात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत खराडीतील हॉस्पिटलच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाला सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी मतदान घेऊन मंजुरी दिली. तर बोपोडी येथील हॉस्पिटलसाठी आलेली निविदा दप्तरी दाखल करण्यात आली.
पालिकेने वडगावशेरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापू पठारे यांच्या संबंधित डॉक्टरांना हॉस्पिटल चालविण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप सेना, भाजपाच्या सभासदांनी केला होता. याचा फेरविचार करण्याचा प्रस्तावही स्थायी समितीत देण्यात आला होता. मात्र, तो प्रस्ताव आज समितीत मतदानाद्वारे रद्द करण्यात आला. या रुग्णालयासाठी पालिकेस दर वर्षी 35 लाख रुपयांचे भाडे मिळणार आहे. मात्र, प्रचलित रेडिरेकनर व खराडी येथील जागांचे भाव पाहता सुमारे 22 हजार 500 चौरसफूट जागा असलेल्या या रुग्णालयातून पालिकेस सरासरी 70 लाख मिळणो अपेक्षित असल्याने शहरातील स्वयंसेवी संस्थांनीही या प्रस्तावास विरोध केला होता. मात्र, या सत्ताधारी पक्षांकडून या खासगीकरणाच्या प्रस्तावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले
आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेला बोपोडी आणि खराडी भागात आर 7 अंतर्गत हॉस्पिटलचे आरक्षण असलेल्या जागांसाठी दोन बांधलेल्या मिळकती मिळाल्या आहेत. या मिळकतींमध्ये हॉस्पिटल चालू करण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत ही हॉस्पिटल खासगी संस्थांना चालविण्यासाठी देण्याचा घाट महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने घातला आहे.