खासगी वैद्यकीय सेवाही होणार विस्कळीत
By Admin | Updated: March 23, 2017 04:40 IST2017-03-23T04:40:38+5:302017-03-23T04:40:38+5:30
उच्च न्यायालयाने फटकारूनही ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बंद सुरूच ठेवला आहे.

खासगी वैद्यकीय सेवाही होणार विस्कळीत
पुणे : उच्च न्यायालयाने फटकारूनही ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बंद सुरूच ठेवला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननेही पाठिंबा देऊन आपल्या सर्व सदस्यांना बंदचे आवाहन केले आहे. यामुळे पुण्यातील खासगी वैद्यकीय सेवाही विस्कळीत होण्याची भीती आहे.
डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांनी बंद सुरू केला आहे. निवासी डॉक्टरांनी केलेल्या संपामुळे रुग्णांचे हाल होत असल्याने मंगळवारी उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘सुरक्षेबाबत भीती वाटत असेल तर राजीनामा द्या,’ असे सांगत न्यायालयाने निवासी डॉक्टरांना फटकारले. संप तातडीने मागे न घेतल्यास उच्च न्यायालयाचा अवमान केल्याने संबंधित निवासी डॉक्टरांवर नियमानुसार कारवाई करण्याचे पत्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे ससूनला देण्यात आले होते. त्यानुसार, रात्री ८ वाजेपर्यंत कामावर रुजू न झाल्यास अभ्यासक्रम नोंदणी रद्द करण्याची किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा ससूनतर्फे निवासी डॉक्टरांना देण्यात आला. त्यानंतर रात्री नोटिसा मिळाल्यावर १०५ डॉक्टर पुन्हा रुजू झाले. बुधवारी दुपारनंतर वातावरण पुन्हा चिघळल्याने रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांनी पुन्हा काम थांबविले. त्यामुळे एकूण २७२ निवासी डॉक्टरांना निलंबनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या. रुग्णालय प्रशासनासह रात्री उशिरापर्यंत बैैठका सुरू होत्या.
ससून रुग्णालयाचे उपअधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी सांगितले, की उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही निवासी डॉक्टर कामावर रुजू झाले नाहीत.
त्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ससून रुग्णालयातील सेवा सुरू ठेवण्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३४ प्राध्यापक व १०० सहयोगी प्राध्यापक कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे तातडीच्या वैद्यकीय सेवेवर परिणाम होणार नाही. (प्रतिनिधी)