पुण्याची काँग्रेसची धूरा पृथ्वीराज चव्हाणांकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:33+5:302021-07-20T04:09:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी रात्री पुण्यातील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. महापालिका ...

पुण्याची काँग्रेसची धूरा पृथ्वीराज चव्हाणांकडे?
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी रात्री पुण्यातील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चव्हाण यांच्याकडे पुणे शहराची जबाबदारी सोपवल्याची चर्चा त्यावरून काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे.
लष्कर भागातील पक्षाच्या एका जुन्या पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी ही बैठक झाल्याचे समजते. पक्षाच्या स्थितीविषयी चव्हाण यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. निष्क्रिय पदाधिकारीच याला जबाबदार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. अशीच स्थिती राहिली तर पक्ष शहरातून अस्तित्वहिन होईल, त्यानंतर तुमचेही काही महत्व राहणार नाही असे चव्हाण यांनी सुनावले असल्याचे समजते.
शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेशाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, पालिकेतील गटनेते आबा बागूल, नगरसेवक अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे आदी बैठकीला उपस्थित होते.
महापालिकेत यश मिळवायचे असेल तर आतापासूनच त्याची तयारी करायला हवी अशी सूचना त्यांनी केली. पक्षाचा तळागाळातील पाया ढिला झाला आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जनसंपर्क तुटला आहे. सर्वांनी प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर जाऊन काम करायला लागा असे चव्हाण यांनी सांगितले. उपनगरांसाठी त्वरीत तेथील कार्यकर्त्यांच्या बैठका घ्या, समिती स्थापन करून जबाबदाऱ्यांचे वाटप करा त्यासाठी नागरिकांच्या प्रश्नांवर काम करा असे चव्हाण यांनी सांगितल्याचे समजते.