पैसे काढण्यासाठी गावपुढाऱ्यांनाच प्राधान्य
By Admin | Updated: November 14, 2016 01:59 IST2016-11-14T01:59:40+5:302016-11-14T01:59:40+5:30
लासुर्णे (ता. इंदापूर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. येथे नोटा बदलून घेण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी गावपुढायांनाच प्राधान्य मिळत आहे.

पैसे काढण्यासाठी गावपुढाऱ्यांनाच प्राधान्य
लासुर्णे : लासुर्णे (ता. इंदापूर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. येथे नोटा बदलून घेण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी गावपुढायांनाच प्राधान्य मिळत आहे.सर्वसामान्यांना मात्र, हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गावपुढाऱ्यांना सहकार्याची भुमिका घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. त्यासाठी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, अशी मागणी होत आहे.
नुकत्याच शासनाने हजार व पाचशे च्या नोटावर बंदी घातल्याने सर्वच बँकेत नोटा बदलून घेण्यासाठी तसेच पैसे भरण्यासाठी अथवा काढण्यासाठी रांगाच्या रांगा लागत आहेत. लासुर्णे (ता. इंदापूर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या तीन चार दिवसांपासून तुडुंब गर्दी होत आहे. परंतु, या शाखेत सहकारी संस्थाचे कर्मचारी व गावपुढारी थेट काउंटरच्या आत प्रवेश मिळवित आहेत. तेथे जाउन हे पुढारी कामकाज करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सर्वसामान्यांना मात्र रांगेत उभा राहूनही‘ कॅश ’ संपल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शनिवार व रविवार या दोन दिवशी रांगेत उभा राहूनही सर्वसामान्यांना पैसे मिळाले नाहीत. यासाठी शाखेतील सीसीटीव्हीचे फुटेज तपासावे. त्यामध्ये गावपुढाऱ्यांना सहकार्य करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी लासुर्णेतील सामाजिक कार्यकर्ते गजानन वाकसे यांनी केली आहे.
..पैसे देत नाही, काय करायचे ते करा-
सांगवी येथे युको बॅँकेच्या अधिकाऱ्यांकडून शनिवार ी (दि. १२ ) ग्राहकांना अरेरावी करण्यात आली. अभिषेक तावरे व सचिन शिंदे हे दोन युवक युको बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. उशिरापर्यंत रांगेत थांबून ही पाठीमागून येणाऱ्या ग्राहकांना उपव्यवस्थापक मनिष क्रिपालाणी हे पैसे देताना पाहिल्यावर या दोन युवकांनी विचारणा केली .त्यावर क्रिपालाणी यांनी ‘पैसे देत नाही ,काय करायचे ते करा. तुमची खाते बंद करतो, अशी धमकी दिली.तसेच, हातामधील बँकेचे पासबूक व चलन फेकुन दिली. काय करायचे ते करा, अशी धमकी दिली. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात यावी व अधिकाऱ्याला कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
जुन्या नोटा स्वीकारण्याची महावितरणची मुदत आज संपणार-
बारामती : वीजबिलासाठी जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी राज्य शासनाने दिलेली तीन दिवसांची मुदतवाढ सोमवारी मध्यरात्री संपणार आहे. मुदतवाढीचा निर्णय झाल्यानंतर शनिवारप्रमाणेच रविवारीही ग्राहकांनी वीजबील भरण्यासाठी गर्दी केली होती. जुन्या नोटा भरून थकबाकीमुक्त होण्याची वीजग्राहकांना सोमवारी अखेरची संधी आहे. सोमवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरू राहणार आहेत. सोमवारी (१४ नोव्हेंबर) सार्वजनिक सुटी असली तरी महावितरणने जिल्ह्णातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. महावितरणच्या घरगुती व वैयक्तिक वीजग्राहकाचे वीजबिल जेवढ्या रकमेचे असेल तेवढ्या रकमेच्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. त्यासाठी कोणतीही मयार्दा ठेवण्यात आलेली नाही. तसेच वीजबिलापोटी आगाऊ स्वरूपात (डव्हान्स पेमेंट) घेतले जाणार नाही. वीजग्राहकांना त्वरित वीजबिल भरता यावे यासाठी आवश्यक पूर्वतयारीसह जिल्ह्णातील सर्वच केंद्रांवर महावितरणच्या नियमित कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.