‘स्मार्ट’साठी ७ लाख वेळा प्राधान्यक्रम पसंती
By Admin | Updated: October 11, 2015 04:35 IST2015-10-11T04:35:17+5:302015-10-11T04:35:17+5:30
स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडे सादर करण्याच्या प्रस्तावाच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत एकूण ५० हजार जणांनी ७ लाख वेळा प्राधान्यक्रम पसंती दिली. पहिल्या टप्प्यात निश्चित

‘स्मार्ट’साठी ७ लाख वेळा प्राधान्यक्रम पसंती
पुणे : स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारकडे सादर करण्याच्या प्रस्तावाच्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत एकूण ५० हजार जणांनी ७ लाख वेळा प्राधान्यक्रम पसंती दिली. पहिल्या टप्प्यात निश्चित झालेल्या एकूण ६ समस्या कशा सोडवता येतील, यासाठी प्रत्येकी ९ उद्दिष्टांवर या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून प्राधान्यक्रम पसंती घेण्यात येत आहे.
सोमवारपर्यंत (दि. १२) हे काम चालणार असून किमान एक लाख नागरिकांनी तरी मत नोंदवणे प्रशासनाला अपेक्षित आहे. हे सर्व मतदान आॅनलाईन म्हणजे मोबाईल किंवा टॅबवर घेतले जात आहे. त्यासाठी प्रशासनाने महापालिका कर्मचारी, विद्यार्थी अशी साधारण ८०० जणांची टीम तयार केली आहे. महापालिकेचे प्रवेशद्वार, शहरातील काही गर्दीच्या ठिकाणी यासाठी केंद्र तयार करण्यात आले असून तिथे महापालिका कर्मचारी नागरिकांकडून अर्ज लिहून घेत आहेत.
विद्यार्थ्यांना शहरातील विविध वसाहतींच्या ठिकाणी पाठवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात साधारण ३ लाख नागरिकांनी याला प्रतिसाद दिला असून त्यामध्ये भविष्यातील शहर कसे असावे, याला सर्वाधिक पसंती शहर स्वच्छ असावे, याला मिळाली आहे. तसेच वाहतूक, पाणी, विद्युत अशा एकूण ६ समस्या निश्चित झाल्या होत्या. (प्रतिनिधी)
आयुक्त कुणाल कुमार यांच्या प्रशासनालाही स्मार्ट सिटीमध्ये गुंतवून टाकण्यावर लोकप्रतिनिधींकडून टीका होत आहे. त्यातच आयुक्तांनी पालिकेचे उत्पन्न घटत असल्याचे स्पष्ट करीत विकासकामांवर निर्बंध टाकले असल्याने बहुसंख्य नगरसेवकांनी स्मार्ट सिटीला लक्ष्य केले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाने आपले काम सुरूच ठेवले असून आता सोमवारनंतर या प्रस्तावाचा उद्दिष्टपूर्ती कशी करायची, ते निश्चित करण्याचा तिसरा टप्पा सुरू होईल.