अंदाजपत्रकातही सुरक्षेलाच प्राधान्य

By Admin | Updated: February 3, 2016 00:51 IST2016-02-03T00:51:18+5:302016-02-03T00:51:18+5:30

अंदाजपत्रकासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन महापालिकेने केले होते. यामध्ये अनेक नागरिकांनी सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे

Priority in budget budget | अंदाजपत्रकातही सुरक्षेलाच प्राधान्य

अंदाजपत्रकातही सुरक्षेलाच प्राधान्य

पिंपरी : अंदाजपत्रकासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन महापालिकेने केले होते. यामध्ये अनेक नागरिकांनी सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. अंदाजपत्रकासाठी आलेल्या सूचनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत अधिकाधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या अंदाजपत्रकासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्यानुसार महापालिकेने दिलेल्या मुदतीत ३३४ सूचना प्राप्त झाल्या. यामध्ये १६५ स्वीकारण्यात आल्या, तर १६९ नाकारण्यात आल्या. सूचना देण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत होती. मुदतीत नागरिकांना ज्या त्या क्षेत्रीय कार्यालयात लेखी कामे सुचविता येतील, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी आपल्या सूचना दिल्या. यातील योग्य सूचनांचा समावेश आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात केला जाणार आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २००७-०८ या आर्थिक वर्षांपासून नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा अंदाजपत्रकात अंतर्भाव केला जात आहे. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करताना नागरिकांकडून सूचना मागविण्यात येतात. अंदाजपत्रक लोकाभिमुख व्हावा, या दृष्टीने नागरिकांकडून अंदाजपत्रकासाठी सूचना मागविण्याचा उपक्रम महापालिकेकडून राबविला जात आहे. यासाठी सहा ठिकाणी जनसभा घेण्यात आल्या.
नाकारण्यात आलेल्या बऱ्याचशा सूचना अशा आहेत की, ज्यासाठी पालिकेने अगोदरच अंदाजपत्रकात तरतूद केलेली आहे, तर काही सूचनांमध्ये जागा ताब्यात नसणे, प्रकरण न्यायप्रविष्ट असणे, अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी होत्या. काही सूचना देण्यापूर्वीच ते काम पूर्ण झाले आहे, अशाही कामांचा नाकारण्यात आलेल्या सूचनांमध्ये समावेश आहे. त्यामुळे काही सूचना नाकारल्या आहेत.(प्रतिनिधी)‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक १४२ सूचना प्राप्त झाल्या. यातील ८७ सूचना स्वीकारण्यात आल्या, तर ५५ सूचना नाकारण्यात आल्या. ‘ड’ कार्यालयांतर्गत सहा सूचना प्राप्त झाल्या. त्या सर्व स्वीकारण्यात आल्या.
ज्येष्ठ नागरिकांकडून विरंगुळा केंद्र व उद्यान उभारणी करण्याबाबत अधिकाधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. तर तरुण वर्गाकडून वाचनालय उभारण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
रस्ते, पदपथ, आरोग्य, रस्त्यावरील गतिरोधक, उद्याने आदींबाबत सूचना मांडण्यात आल्या. महापालिकेने दिलेल्या या संधीमुळे नागरिकांना विविध कामे सुचविता आली.

Web Title: Priority in budget budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.