निवडणुकीमुळे छपाई उद्योग तेजीत
By Admin | Updated: February 15, 2017 02:33 IST2017-02-15T02:33:36+5:302017-02-15T02:33:36+5:30
महापालिका निवडणुकीतील उमेदवारांचे अहवाल, राजकीय पक्षांचे जाहीरनामे यामुळे शहरातील छपाई उद्योगाला तेजी आली आहे.

निवडणुकीमुळे छपाई उद्योग तेजीत
पुणे : महापालिका निवडणुकीतील उमेदवारांचे अहवाल, राजकीय पक्षांचे जाहीरनामे यामुळे शहरातील छपाई उद्योगाला तेजी आली आहे. शनिवार पेठेतील कागद बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल झाली असून, आता कागद ब्लॅकने विकला जात आहे. छपाईच्या कामांनी शनिवार, नारायण पेठेतील बहुसंख्य छापखाने बुक झाले असून, आता कामे पुण्याबाहेरून करून आणली जात आहे. किमान १ हजार टन तरी कागदाचा वापर झाला असेल, असा या क्षेत्रातील माहीतगारांचा अंदाज आहे. छपाईशी संबंधित गोष्टींचे दरही भरमसाट वाढवण्यात आले आहेत.
गुळगुळीत कागदावर, छायाचित्रांचा सुकाळ व आश्वासनांचा भडिमार असलेले अहवाल ही निवडणुकीतील उमेदवाराची ओळख झाली आहे. यासाठी लागणारा आर्ट पेपर शनिवार पेठेतील पेपर मार्केटमध्ये मिळतो. गेल्या महिनाभरात या मार्केटमध्ये आर्ट पेपरला जोरदार मागणी आहे, असे तेथील व्यावसायिकांनी सांगितले. कागदाची गुणवत्ता तो किती किलोचा आहे त्यावर मोजली जाते. ९० जीएसएम व १३० जीएसम असे दोन प्रकार आहेत. एक रिम साधारण १६ किलोची असते. तिची किंमत १७०० ते १८०० रूपये आहे. २० हजार प्रतीचा सर्वसाधारण आकाराचा एक अहवाल करायचा असेल तर ८० रिम कागद लागतो. मागणी असल्याने कागदाचे, छपाईचे, मजकूर डीटीपी तयार करून घेण्याचे दर वाढले आहेत. प्रत्येक ठिकाणी साधारण २०० ते ३०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यातून गेल्या महिनाभरात या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. व्यावसायिक फोटोग्राफर्सनाही उमेदवारांकडून चांगली मागणी आहे. विविध पोझमधील छायाचित्र काढून त्यावर प्रक्रिया करून ती वापरली जात आहेत. (प्रतिनिधी)