लोणी काळभोर : हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या पोलीस पथकाने कुंजीरवाडी गावाच्या हद्दीत चालणाऱ्या एका मटका, जुगार व सोरटच्या धंद्यावर छापा घालून सहा जणांविरोधात जुगारप्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊ तानाजी खलसे (रा. कुंजीरवाडी, ता. हवेली), जयसिंग श्रीपती जगताप (वय ५६, रा. गुंजाळमळा, सोरतापवाडी, ता. हवेली), गेनबा शिवाजी धनगर (वय २६, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली), शब्बीर पठाण, दत्ता, अक्षय ढगे (तिघांचे पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही.) या पाच जणांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम २०१२ कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचारी विकास दत्तात्रय लगस यांनी फिर्याद नोंदविली आहे.
हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांना पुणे-सोलापूर महामार्गालगत कुंजीरवाडी गावाच्या हद्दीत साई लॉजच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये भाऊ खलसे मटका, जुगार, सोरटचा धंदा चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक आर. के. रानगर, विकास लगस, नागटिळक, आतार, महेंद्र चांदणे, अभिमान कोळेकर या पोलीस पथकाने या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी कामगार जयसिंग जगताप पैसे घेऊन मटका खेळणाºयांना चिठ्ठ्या देत होता. पोलीस पथकाला बघून शब्बीर पठाण, दत्ता व अक्षय ढगे असे तिघे जण पळून गेले. पोलिसांनी या ठिकाणाहून रोख रकमेसह ५ हजार ९३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस करीत आहेत.