पंतप्रधानांनी केली लस उत्पादनाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:03 IST2020-11-29T04:03:29+5:302020-11-29T04:03:29+5:30
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला शनिवारी भेट दिली. तत्पूर्वी अहमदाबाद ...

पंतप्रधानांनी केली लस उत्पादनाची पाहणी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला शनिवारी भेट दिली. तत्पूर्वी अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्क, हैदराबाद येथील भारत बायोटेकला भेट दिली. त्यानंतर ४.२५ मिनिटांनी वायुसेनेच्या विमानाने त्यांचे लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी ले. जनरल सी. पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
मोदी हेलिकॉप्टरमधून ४.४५ मिनिटांनी सीरम इन्स्टिट्यूटच्या आवारात दाखल झाले. सायरस पुनावाला, आदर पुनावाला आणि नताशा पुनावाला यांनी अभिवादन करत मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर आदर पुनावाला यांनी सिरमने आजवर तयार केलेल्या लसींचे डिजिटल सादरीकरण मोदींना दाखवले. त्यानंतर सिरमच्या पदाधिकाऱ्यांसह नरेंद्र मोदी यांनी चर्चा करून लसीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. मोदी साधारणपणे सव्वा तास सिरममध्ये होते. ५.५५ मिनिटांनी ते लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले.
''''''''सिरम''''''''कडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लस उत्पादनाची जगातील सर्वात मोठी क्षमता सीरमकडे आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीचे उत्पादन करण्याचे हक्क सीरम इन्स्टिट्यूटने मिळवले आहेत. या लसीच्या चाचण्यांचे विविध टप्पे जाणून घेण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. सिरममध्ये या लसीचे उत्पादन योग्य पद्धतीने पूर्ण झाले तर पुण्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा असेल.
-----
कोरोनाची लस लोकांपर्यंत कधीपर्यंत पोहोचू शकते आणि कोणत्या माध्यमातून पोहोचू शकते हे दौऱ्यानंतर स्पष्ट होऊ शकेल. सिरम इन्स्टिट्यूटतर्फे कोव्हीशिल्ड लसीचे ४ कोटी डोस उत्पादित करण्यात आले आहेत. कोरोना लस कोणाला मोफत उपलब्ध होईल? का? किती प्रमाणात उत्पादित होईल? याची उत्तरे पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लसीची साठवणूक, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि सिरमशी सरकारला लस वितरणाच्या दृष्टीने करावा लागणारा खर्च याविषयीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊ शकतात.