प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्या यंदाही रद्द
By Admin | Updated: May 19, 2015 23:55 IST2015-05-19T23:55:35+5:302015-05-19T23:55:35+5:30
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्या वेळेत झाल्या नाहीत. दर वर्षी मे महिन्यात होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या या वर्षीही रद्द झाल्या आहेत.

प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्या यंदाही रद्द
बारामती : गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्या वेळेत झाल्या नाहीत. दर वर्षी मे महिन्यात होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या या वर्षीही रद्द झाल्या आहेत. नुकताच ग्रामविकास खात्याने हा निर्णय घेतला आहे. यामुळे शिक्षकवर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.
कक्ष अधिकारी संजय कुडवे यांनी सर्व जिल्हा परिषदांना हा शासननिर्णय पाठविला आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बदल्यांना न्यायालयाकडून स्थिगिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक संचालकांनी यावर्षी बदली करण्याबाबत ग्रामविकास खात्याकडे मार्गदर्शन मागितले होते. शालेय शिक्षण विभागाकडून आरटीई अॅक्टअंतर्गत पटनिश्चिती, पदनिश्चितीची कार्यवाही पूर्ण झाली नाही. या सर्व गोष्टींना न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे. त्यामुळे फक्त ‘आपसी बदल्यां’ना परवानगी देण्यात येत आहे. इतर कोणत्याही प्रशासकीय बदल्या, विनंती बदल्या, आंतरजिल्हा बदल्या करण्यात येणार नाहीत, असे शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, मुख्याध्यापक पदोन्नती, पदवीधर शिक्षक पदोन्नती आदी प्रक्रि या होऊ शकली नाही. सद्यस्थितीत आपसी बदली वगळता इतर बदल्या करणे अडचणीचे होत असल्याची सर्व जिल्ह्यांत परिस्थिती आहे, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे शिक्षकवर्गात असंतोष असल्याचे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मागील तीन वर्षांपासून तालुकांतर्गत विनंती बदल्या रिक्त जागा नसल्याने होत नाहीत. सेवा खंडित करण्यासाठी, गैरसोयीच्या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी काम करण्यासाठी तालुकातंर्गत विनंती, आपसी, प्रशासकीय बदल्यांची आवश्यकता होती. मात्र, यंदाही मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही बदल्या रद्द झाल्याने शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे.या संदर्भात शासन लवकरच नवीन धोरण जाहीर क रणार आहे. या वेळी मागण्या प्रभावीपणे मांडल्या जातील, असे होळकर यांनी सांगितले.
समायोजन बदल्यांच्या कारणावरून गेल्या वर्षापासून शिक्षकांच्या बदल्या रद्द होत आहेत, ही गंभीर व दुर्दैवी बाब आहे. मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये रिक्त जागा नसल्याने तालुकांतर्गत विनंती बदल्या होत नाहीत. या बदल्यांबरोबरच आपसी व प्रशासकीय बदल्या करण्यात याव्यात अशी बहुतांशी शिक्षकांची मागणी आहे.
- नंदकुमार होळकर ,
जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती
आपसी बदल्यांव्यक्तिरिक्त इतर झालेल्या बदल्या स्थगित करण्यात आल्या आहेत. न्यायालयाचा निर्णय हा सर्वांवर बंधनकारक असतो. या संदर्भात आरटीईच्या नियमांनुसार लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र यावर शिक्षकांच्या सर्व संघटनांनी एकच समान उपाय शोधला तर यावर सामोपचाराने निर्णय घेता येईल.
- सत्यजित बडे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
पुणे जिल्हा परिषद,