‘शिक्षक लॉबी’चा दबाव
By Admin | Updated: November 3, 2015 03:30 IST2015-11-03T03:30:26+5:302015-11-03T03:30:26+5:30
‘ड्रेसकोडबाबतची चर्चा त्वरित थांबवा, आमच्या संघटनेचे दहा हजार शिक्षक आहेत. सव्वा लाख मते आहेत, हे लक्षात घ्या, असा इशाराच पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी

‘शिक्षक लॉबी’चा दबाव
पुणे : ‘ड्रेसकोडबाबतची चर्चा त्वरित थांबवा, आमच्या संघटनेचे दहा हजार शिक्षक आहेत. सव्वा लाख मते आहेत, हे लक्षात घ्या, असा इशाराच पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि शिक्षण अधिकाऱ्यांना दिला.
३१ आॅक्टोबर रोजी
शिक्षक संघाने आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चाचे निवेदन घेण्यासाठी शिक्षणाधिकारी उपस्थित
नसल्याने आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी व शिक्षकांच्या मागण्यांसदर्भात सोमवारी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या दालनात शिक्षक संघाचे पदाधिकारी आले होते. यावेळी उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती शुक्राचार्य वांजळे, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख उपस्थित होते.
नुकतीच पुणे जिल्हा परिषदेला पंचायतराज कमिटीने भेट दिली होती. या भेटीत समितीने काही जिल्ह्यांत शिक्षकांना ड्रेसकोड केला आहे. आपल्या शिक्षकांनाही ड्रेसकोड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्याधिकारी कांतीलाल उमाप व शिक्षणाधिकारी मुश्ताख शेख यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत बैैठक आयोजित केली आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने आजच भेट घेतली. या वेळी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी सुरुवातीलाच शिक्षणाधिकाऱ्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. आमच्या मोर्चाला शिक्षणाधिकारी सामोरे
आले नाहीत, हा माणूस कार्यालयात बसत नाहीत, असा आरोप केला. शिक्षणाधिकारी शेख स्पष्टीकरण देत असताना त्यांना बोलू दिले नाही. या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अध्यक्ष, उपाध्यक्ष
आमची संघटना तुमची आहे. आमच्या संघाचे १0 हजार सभासद आहेत. सव्वा लाख मते आमच्या हातात आहेत... त्यावर अध्यक्ष कंद म्हणाले, बैठकीत तुमचे मत मांडा, नंतर
निर्णय करू, तेव्हा एका पदाधिकाऱ्याने आम्ही उद्याच्या बैठकीवर बहिष्कार टाकत आहे, हे आताच सांगतो, असे बजावले.
या वेळी या शिष्टमंडळाने दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली पुरवणी बिले त्वरित मिळावी, रोस्टरचे काम दोन महिन्यांत पूर्ण करावे, आदिवासी भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी त्वरित मिळावी, आदी मागण्या केल्या. (प्रतिनिधी)
यासंदर्भात पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष नंदकुमार होळकर यांच्याशी चर्चा केली असता, ‘आमचाही विरोधच आहे; मात्र उद्या होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहून आमचा याला का विरोध आहे तो स्पष्टपणे मांडू’ असे सांगितले.
आमचा शिक्षक शाळा आयएसओ करण्यासाठी जिवाचे रान करीत आहे. गुणवत्तेसाठी तुम्ही जे सांगाल ते करू; मात्र ड्रेसकोड मान्य करणार नाही. याची चर्चा त्वरित थांबवा. उद्या होणाऱ्या बैैठकीवर आम्ही बहिष्कार टाकत आहोत.
- बाळासाहेब मारणे,
अध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ