दौंड तालुक्यामध्ये इच्छुकांचा तिकिटासाठी दबावगट

By Admin | Updated: January 14, 2017 03:21 IST2017-01-14T03:21:40+5:302017-01-14T03:21:40+5:30

तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे.

The pressure group for the wishlist ticket in Daund taluka | दौंड तालुक्यामध्ये इच्छुकांचा तिकिटासाठी दबावगट

दौंड तालुक्यामध्ये इच्छुकांचा तिकिटासाठी दबावगट

मनोहर बोडखे / दौंड
तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. तिकीट मिळावे म्हणून नेते मंडळींकडे शिष्टमंडळ, दबाव गट सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच काही मर्जीतील लोकांना कामाला लागा अशा सूचना नेते मंडळींकडून मिळाल्याने कार्यकर्त्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीस सुरुवात केली आहे.
उमेदवारी मिळेल किंवा नाही याची चिंता न करता कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणात राहायचे असा निश्चयही काही कार्यकर्त्यांनी केल्यामुळे त्यांनीदेखील कामाला सुरुवात केली आहे.
सध्याच्या परिस्थितीत दौंड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. पंचायत समितीत आमदार राहुल कुल गट आणि रमेश थोरात गटाच्या समसमान जागा निवडून आल्या आहेत. परंतु कुल गटाचा एक सदस्य फुटल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढल्याने पंचायत समितीत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.
पुढील महिन्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपा, रासपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, आरपीआयचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील असे एकंदरीत चित्र आहे.
एरवी कुल आणि थोरात यांच्या भोवती फिरणाऱ्या निवडणुकांना आता छेद मिळाला असून तालुक्यात भाजपाने डोके वर काढल्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे, नियोजन मंडळाचे सदस्य नामदेव ताकवणे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. तालुक्यात आमदारकीच्या माध्यमातून रासपाची सत्ता आहे. तेव्हा भाजपा आणि रासपा यांची युती होईल, असे बोलले जात आहे. कारण भीमा पाटस कारखाना या वर्षी सुरू झालेला नाही. त्याचा फटका कुल गटाला दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बसला. त्यामुळे या निवडणुकीत कुल गटाला खाते उघडता आले नाही. तेव्हा भविष्यातील राजकीय संभाव्य धोका लक्षात घेता आमदार राहुल कुल आपला मित्र पक्ष भाजपाबरोबर युती करतील असा राजकीय अंदाज आहे. मात्र युतीसाठी भाजपा कितपत रासपाला प्रतिसाद देतो यावरही राजकीय गणिते अवलंबून आहेत. कारण भाजपाचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे, नामदेव ताकवणे यांची तालुक्यात ताकद वाढली असल्याची वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही. जर रासपाची भाजपाबरोबर युती झाली नाही तर राहुल कुल हे कोणता पवित्रा घेतात याकडे लक्ष लागून राहील.

Web Title: The pressure group for the wishlist ticket in Daund taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.