‘स्मार्ट’ एसपीव्ही आयुक्तांकडून तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 04:00 IST2016-02-07T04:00:51+5:302016-02-07T04:00:51+5:30
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीला ज्यावरून सर्वाधिक विरोध झाला त्या वादग्रस्त एसपीव्हीचा (स्पेशल पर्पज व्हेईकल- स्वतंत्र कंपनी) मसुदा तयार झाला असून सोमवारी तो नगरसचिव कार्यालयाकडे

‘स्मार्ट’ एसपीव्ही आयुक्तांकडून तयार
पुणे : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीला ज्यावरून सर्वाधिक विरोध झाला त्या वादग्रस्त एसपीव्हीचा (स्पेशल पर्पज व्हेईकल- स्वतंत्र कंपनी) मसुदा तयार झाला असून सोमवारी तो नगरसचिव कार्यालयाकडे पाठवण्यात येईल. त्यांच्याकडून तो विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करून तिथे मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. याबाबत प्रशासनाकडून गुप्तता बाळगण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेत पुण्याची देशस्तरावर दुसऱ्या क्रमांकाने निवड होताच केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये एसपीव्हीच्या स्थापनेबाबत त्वरा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आयुक्तांनी या कंपनीचा मसुदा तयार केला आहे. केंद्र सरकारने त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही दिल्या होत्या. त्याप्रमाणे आयुक्तांनी प्राथमिक रचना केली आहे. त्यात कंपनीचा उद्देश, घटना, रचना, कार्यक्षेत्र, अधिकार याबाबतचा समावेश असल्याचे समजते.
उपसूचना डावलल्या, आता स्थायी समितीकडे लक्ष
स्मार्ट सिटीला विरोध करताना बहुसंख्य पदाधिकारी तसेच नगरसेवकांचा या एसपीव्हीवरच सर्वाधिक आक्षेप होता. अशा प्रकारच्या कंपनीमुळे महापालिकेच्या पर्यायाने लोकनियुक्त प्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा येते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या कंपनीचे अध्यक्ष महापौर असतील, संचालक मंडळात लोकनियुक्त प्रतिनिधीची संख्या जास्त असेल, अशा बऱ्याच उपसूचना त्यांनी प्रस्ताव केंद्राकडे पाठवताना केल्या होत्या. मात्र त्या सर्व उपसूचना डावलल्या गेल्या असल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळेच आता सर्वसाधारण सभेत पदाधिकारी कंपनीच्या मसुद्याला मंजुरी देताना काय करतील, याची उत्सुकता पालिका वर्तुळात तसेच बाहेरही आहे.