टोलवसुली बंद पाडण्याची तयारी
By Admin | Updated: June 8, 2015 05:26 IST2015-06-08T05:26:00+5:302015-06-08T05:26:00+5:30
ठेकेदाराकडून बाजूपट्ट्याच्या तात्पुरत्या मलमपट्टीचे काम सुरू केल्याने देहूरोडच्या नागरिकांनी हरकत घेत शनिवारी सदर काम थांबविले होते

टोलवसुली बंद पाडण्याची तयारी
किवळे : मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी ते देहूरोड दरम्यान संरक्षक बाजूपट्ट्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण चार दिवसांत करण्याबाबत बैठकीत इशारा देऊनही ठेकेदाराकडून बाजूपट्ट्याच्या तात्पुरत्या मलमपट्टीचे काम सुरू केल्याने देहूरोडच्या नागरिकांनी हरकत घेत शनिवारी सदर काम थांबविले होते. रस्ते विकास महामंडळाने संबंधित कामे सुरु करण्याबाबत पत्र देऊनही सदर रस्त्याच्या कामाचे आदेश प्राप्त झाले नसल्याचा दावा संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आला आहे. चार दिवसांची मुदत देऊनही काम न केल्याने सोमाटणे येथील टोलवसुली आमदार संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली थांबविण्याची तयारी देहूरोडकरांनी सुरू केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम रखडल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. त्याबाबत उपाययोजना करण्याबाबत ३ जूनला देहूरोड येथील महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व देहूरोडचे नागरिक यांच्या संयुक्त बैठकीत आमदार भेगडे यांनी निगडी ते देहूरोड दरम्यानच्या संरक्षक बाजू पट्ट्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करून सोमवारपर्यंत पूर्ण करावे अन्यथा सोमाटणे येथील टोलवसुली थांबविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी संबंधित रस्त्याची दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या ठेकेदार कंपनीला (म्हैसकर इन्फ्रा. प्रा. लि. ) ५ जूनला पत्र पाठवून निगडी ते देहूरोड संरक्षक बाजूपट्ट्यांचे निविदा तरतुदीनुसार दुरुस्ती करण्याबाबत लेखी पत्र दिले आहे. (वार्ताहर)
शनिवारी दुपारी संबंधित ठेकेदाराने देहूरोड येथे रस्त्याच्या बाजूपट्ट्या मजबुतीकरण न करता तात्पुरती कामे करण्यास सुरुवात केली होती. मात्र ही बाब लक्षात येताच विशाल खंडेलवाल, मलंग मारिमुत्तू, रघुवीर शेलार, तसेच अंजनी बत्तल, विनायक काळे, दिनेश श्रीवासन आदी नागरिकांनी सदर काम थांबविण्यास भाग पाडले.