शिखरी काठ्यांच्या यात्रेची तयारी पूर्ण
By Admin | Updated: February 2, 2015 23:15 IST2015-02-02T23:15:31+5:302015-02-02T23:15:31+5:30
जेजुरीत उद्यापासून सुरू होत असलेल्या माघ पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या शिखरी काठ्यांच्या यात्रेची तयारी पूर्ण झालेली असून, प्रशासनाने यात्राकाळातील बंदोबस्त सज्ज ठेवलेला आहे.

शिखरी काठ्यांच्या यात्रेची तयारी पूर्ण
जेजुरी : जेजुरीत उद्यापासून सुरू होत असलेल्या माघ पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या शिखरी काठ्यांच्या यात्रेची तयारी पूर्ण झालेली असून, प्रशासनाने यात्राकाळातील बंदोबस्त सज्ज ठेवलेला आहे.
माघ पौर्णिमेनिमित्त जेजुरीत उद्यापासून दोन दिवस शिखरी यात्रा भरणार आहे. संगमनेर येथील होळम, सुपे येथील खैरे, त्याचबरोबर स्थानिक होळकर शिखरी काठ्या देवभेटीसाठी सज्ज झाल्या आहेत. याच काठ्यांच्याबरोबर देवभेट घेणाऱ्यास इतरही ५० शिखरी काठ्या जेजुरीत आल्या आहेत. दर चार वर्र्षांनी कोकणातून येथे येणारे कोळी बांधव आपआपल्या उत्सवमूर्तींच्या पालख्या घेऊन जेजुरीत आले आहेत.
या वर्षी मुरुड जंजिरा, अलिबाग, धारावी, बोडणी, वेसावा, रेवस, मांडवी, मुंबई, आदी भागातील कोळी बांधव यात्रेसाठी येथील ऐतिहासिक चिंचबागेत आले आहेत. चिंचबाग अपुरी पडू लागल्याने बागेनजिकच्या परिसरात या शिखरी काठ्या व कोळी बांधव उतरले आहेत. तंबू टाकून भाविक उतरले असून, कोळी बांधवांच्या गोटात रोज रात्री कोळीगीते, कोळीनृत्याचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. उद्या मंगळवारी कोळी बांधव आपापल्या उत्सवमूर्तींच्या पालख्यांसह देवदर्शन उरकतील. बुधवारी शिखरी काठ्या देवभेट उरकणार आहेत.
प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील, स.पो.नि. रामदास शेळके, मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी कडेपठार रस्ता,
चिंचबाग, शिखरी काठ्या गडावर जाण्याचा मार्ग आदी परिसराची पाहणी केली असून, गडावर जाणारा कच्चा रस्ता बंद करण्यात आला आहे. गडाच्या पायऱ्यावरील अतिक्रमणे हटवण्यात येणार असून, मुख्य पायरी मार्ग एकेरी रहदारीसाठी ठेवण्यात आला आहे. यात्रेसाठी मोठा पोलीस फौजफाटा जेजुरीत दाखल झाला आहे. (वार्ताहर)
वीर येथे आज
देवाचा लग्नसोहळा
खळद /वीर : श्रीक्षेत्र वीर (पुरंदर) येथे सवाईसर्जाचं चांगभलं व माता जोगेश्वरीच्या जयघोषात आज श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा हळदी समारंभ हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. या वेळी देवाला हळद लावण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
वाहनांना प्रवेश नाही
यात्रेच्या नियोजनासाठी मंगळवारी व बुधवारी वाहनांना शहरात प्रवेश नाकारण्यात आला असून, पालखीतळ, बाजारतळ, जुनी जेजुरी, कडेपठार कमान या परिसरात भाविकांनी वाहने पार्किंग करावीत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.