महापालिका निवडणुकीची तयारी

By Admin | Updated: March 21, 2016 00:57 IST2016-03-21T00:57:00+5:302016-03-21T00:57:00+5:30

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणी व संघटन याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे, शिरिष सावंत व अविनाश अभ्यंकर यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली

Preparations for municipal elections | महापालिका निवडणुकीची तयारी

महापालिका निवडणुकीची तयारी

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणी व संघटन याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे, शिरिष सावंत व अविनाश अभ्यंकर यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नागरी प्रश्नांवर पक्षाने जास्तीत जास्त आक्रमक भूमिका घ्यावी, अशी सूचना या वेळी नेत्यांनी केली.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पक्षामध्ये मरगळ आलेली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या वेळी मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस, अजय शिंदे व विभागीय पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीबरोबरच पाडव्याला होणारा पक्षाचा मेळावा याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
सध्या महापालिकेच्या सभागृहात मनसेचे २८ नगरसेवक आहेत. निवडणुकीनंतर मनसे हा सभागृहातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून आला होता. मात्र, गेल्या ४ वर्षांत समीकरण वेगाने बदलत आहेत. देशात आलेल्या मोदी लाटेमुळे केंद्रात व राज्यात सत्तांतर झाले आहे. या सत्तांतराचे तडाखे स्थानिक पातळीवरही बसण्यास सुरुवात झाली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही परप्रांतीयांविरुद्ध पुन्हा एकदा ‘रिक्षा जाळो’ आंदोलनाची घोषणा करून मनसेचा जुना अजेंडा अधिक आक्रमक पद्धतीने राबविण्याचे इरादे जाहीर केले आहेत. रिक्षा जाळो आंदोलनानंतर सर्व स्तरांतून जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी तातडीने काही काळापर्यंत हे आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे. येत्या पाडव्याला ८ एप्रिल रोजी दादर येथील शिवाजी पार्कवर मनसेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मनसेकडून यापुढील काळात पाडवा मेळाव्याद्वारे उत्तर दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे महापालिकेची आगामी निवडणूक ‘४ सदस्यांचा एक प्रभाग’ अशा पद्धतीने घेण्याची चाचपणी राज्य सरकारने सुरू केली आहे. प्रभाग पद्धतीने लढलो तर जास्त फायदा होईल, असे समीकरण मांडून त्या दृष्टीने पावले उचलण्यास भाजपच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे. सरकारचाच एक भाग असलेल्या शिवसेनेने मात्र या प्रभाग पद्धतीला आपला तीव्र विरोध जाहीर केला आहे. प्रभाग पध्दतीने निवडणुका झाल्यास मनसेला खुप ताकद लावावी लागणार आहे.

Web Title: Preparations for municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.