अतिक्रमणांवर जुजबी कारवाई
By Admin | Updated: April 14, 2017 04:15 IST2017-04-14T04:15:11+5:302017-04-14T04:15:11+5:30
येथील नवीन बस स्थानकासमोरील रस्त्याच्या कडेला करण्यात आलेली अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून टाकली. नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात

अतिक्रमणांवर जुजबी कारवाई
जुन्नर : येथील नवीन बस स्थानकासमोरील रस्त्याच्या कडेला करण्यात आलेली अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून टाकली. नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. परंतु केवळ जुजबी कारवाई न करता अतिक्रमणाचा पुरता बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
बसस्थानकासमोर रस्त्याच्या कडेला फळविक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी त्यांच्या हातगाड्यांसमोर मोठ्या प्रमाणात लाकडी मंडप टाकून अतिक्रमण केले होते. जुन्नर-नारायणगाव रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला गटारावर ही अतिक्रमणे करण्यात आली होती.
सामान्य विक्रेत्यांनी त्यांच्या असलेल्या हातगाड्यांच्या पुढे कापडी पाल टाकून ही अतिक्रमणे केलेली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे झालेल्या या अतिक्रमणामुळे हा परिसराला बकालपण आलेले होते. नवीन बसस्थानकाच्या तीनही प्रवेशद्वाराच्या अगदी लगत ही दुकाने व अतिक्रमणे झाली होती.
या अतिक्रमणांचा सर्वाधिक त्रास हा बसचालकांना होत होता. बसस्थानकातून बस बाहेर रस्त्यावर घेताना या अतिक्रमणामुळे बसचालकांना रस्त्याच्या दोनही बाजूकडून येणारी जाणारी वाहने दिसत नसल्याची तक्रार बसचालक सातत्याने करत होते. परंतु एसटी व्यवस्थापन बसचालकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या दुकानदारांचे चांगलेच फावले होते. (वार्ताहर)
अतिक्रमणास सुरुवात झाल्याबरोबरच तातडीने कारवाई केल्यास पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत. त्यामुळे बसस्थानकापासून अगदी थोड्याशा अंतरावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यालय आहे. त्यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाईत सातत्य असावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
जुन्नर-नारायणगाव रस्त्याची रुंदी २५ मीटर आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या साडेबारा मीटर अंतरापर्यंतची अतिक्रमणे काढण्यात आली. तर बाजार समितीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणाबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे.