पूर्व पुरंदरमध्ये बेसुमार वाळूउपसा
By Admin | Updated: December 26, 2014 23:18 IST2014-12-26T23:18:17+5:302014-12-26T23:18:17+5:30
पूर्व पुरंदरमधील कऱ्हा नदीपात्राबरोबरच लहान-मोठ्या पाझर तलावातून रात्रंदिवस वाळूउपसा होत असून, महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत आहे

पूर्व पुरंदरमध्ये बेसुमार वाळूउपसा
जेजुरी : पूर्व पुरंदरमधील कऱ्हा नदीपात्राबरोबरच लहान-मोठ्या पाझर तलावातून रात्रंदिवस वाळूउपसा होत असून, महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. वारंवार तहसील कार्यालयाकडे तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याने शेतकरी संतप्त
झाले आहेत.
आज या परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली असता, नदीपात्रात दिवसाढवळ्या वाळूउपसा जेसीबीच्या साह्याने होत होता.
वाहतुकीसाठीची वाहने शेजारीच उभी होती. तर एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा केलेले ढीग होते. अशा प्रकारे दिवसाढवळ्या वाळूउपसा होत असूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने परिसरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
शेवगाई पाझर तलावातील वाळूउपसा करणारा एक जेसीबी गेल्या पाच दिवसांपासून जेजुरी पोलीस ठाण्यात महसूल विभागाकडून ताब्यात घेऊन लावण्यात आलेला असून, अजूनही त्याच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही.
या संदर्भात पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, या संदर्भात आम्ही त्वरित कारवाई करीत असल्याचे सांगितले.
दरम्यान, जेजुरीचे मंडलाधिकारी संजय बडदे यांनी या परिसरात महसूल कर्मचाऱ्यांसह छापा टाकून मोठ्या प्रमाणावर वाळूसाठ्याच्या ढिगांचे पंचनामे केले आहेत, तर वाळूउपसा करणाऱ्या वाहनांची जप्ती केली असल्याचे सांगितले.
मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळू उपशामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. याबरोबरच नदीचे पात्र बदलण्याचा धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)