मोठ्या उत्साहात भक्तीभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:13 IST2021-09-11T04:13:41+5:302021-09-11T04:13:41+5:30

भोर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या एकूण २०५ गणेश मंडळांपैकी ९१ गावात एक गाव एक गणपती, ही संकल्पना राबवण्यात आली ...

Pranapratisthapana Ganaraya with great enthusiasm and devotion | मोठ्या उत्साहात भक्तीभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना

मोठ्या उत्साहात भक्तीभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना

भोर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या एकूण २०५ गणेश मंडळांपैकी ९१ गावात एक गाव एक गणपती, ही संकल्पना राबवण्यात आली असून, भोर शहरातील ५३ गणेश मंडळांनी जनजागृतीचे देखावे सादर करून या गणेशोत्सवाची रंगत कायम जोपासली आहे. प्रशासनाच्या नियमानुसार मंडळाने गणपतीची मूर्ती ४ फूट उंचीची तर घरगुती २ फूट उंचीची मूर्ती बसवण्याचे बंधन असल्याने बाजारात २५० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत किमतीच्या मूर्ती उपलब्ध होत्या. सजावटीचे साहित्य आणि फुलांचे, फळांचे दरही काहीसे महागच असल्याचे दिसून येत होते. फुलांचे हार १० रुपयांपासून २००- २५० पर्यंत होते.

या सर्व खरेदीसाठी रिमझिम पावसातही कोरोनाची आणि पावसाची पर्वा न करता भोरच्या बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप आले होते; मात्र या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असतानाही भोर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने कानाडोळा केला असल्याचे चित्र पहायला मिळत होते. भोरचे प्रभारी पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी गणेश मंडळांना प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, अशी कृती केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या असून, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी साधेपणाने गणेशोत्सव १० ते १९ तारखेपर्यंत साजरा करावा, विसर्जन मिरवणुका काढू नयेत, डीजे, मोठ्या आवाजातील ध्वनीक्षेपक वाजवू नयेत तर भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्या आवाहनानुसार मंडळांनी मतदार जनजागृतीचे देखावे सादर करावेत व लोकशाही बळकट करावी, अशा मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

भोर तालुक्यात पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे जल्लोषात आगमन होत असते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून गणेश भक्त कोरोनाच्या सावटाखाली असून, आज रोजी ३३ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असताना बाजारपेठेतील आजची गर्दी पाहता कोरोना संपल्याच्या अविर्भावात लोक वावरत असून, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Pranapratisthapana Ganaraya with great enthusiasm and devotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.