जावडेकर, पुण्यासाठी एवढे तरी करा; काँग्रेसची मागणी, आकाशवाणी पुणे बंदच्या निर्णयाचा संताप

By राजू इनामदार | Published: June 14, 2023 04:29 PM2023-06-14T16:29:02+5:302023-06-14T16:30:12+5:30

माजी केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असलेल्या जावडेकर यांनी पुण्यासाठी आकाशवाणी बंदचा निर्णय रद्द करून घ्यावा

prakash Javadekar do that much for Pune Congress demand anger over the decision of Akashvani Pune bandh | जावडेकर, पुण्यासाठी एवढे तरी करा; काँग्रेसची मागणी, आकाशवाणी पुणे बंदच्या निर्णयाचा संताप

जावडेकर, पुण्यासाठी एवढे तरी करा; काँग्रेसची मागणी, आकाशवाणी पुणे बंदच्या निर्णयाचा संताप

googlenewsNext

पुणे: प्रकाश जावडेकर, पुण्यात राहता ना, पुणेकर म्हणवून घेता ना. मग पंतप्रधानांबरोबर संपर्क साधून केंद्र सरकारने बंद केलेले पुणे आकाशवाणी केंद्र पुन्हा सुरू करा अशी मागणी काँग्रेसच्या पुणे शहर शाखेने केली. माजी केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असलेल्या जावडेकर यांनी पुण्यासाठी बाकी काही नाही तर एवढे तरी करावे असे काँग्रेसने म्हटले आहे.

आकाशवाणीची शिवाजीनगरला मोठी जागा आहे. त्याशेजारीच आता मेट्रोचे भूयारी स्थानक होत आहे. त्यामुळे आकाशवाणीची मोकळी जागा कोणाच्या तरी घशात घालण्यासाठी म्हणून हा घाट असल्याचा संशय काँग्रेसने व्यक्त केला आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद करण्यात येत असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे.

आकाशवाणीचा पुणे वृत्त विभाग बंद करून त्याचे स्थलांतर छत्रपती संभाजीनगरला करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी माजी मंत्री जावडेकर यांना जबाबदार धरले आहे. केंद्रात याच खात्याचे मंत्री असताना प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचे धोरण जाहीर झाले होते. त्याला जावडेकर यांनी मंत्री म्हणून विरोध करणे अपेक्षित होते. त्या निर्णयाचा फटका पुणे आकाशवाणी केंद्राला बसला आहे असे जोशी म्हणाले.

जावडेकर केंद्रात मंत्री असतानाच पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्वायत्तता गेली. पुणे दूरदर्शनची देखील त्यांनी दुरावस्था करून टाकली. असे तुघलकी निर्णय केवळ केंद्र सरकारचा पुण्याबद्दल आकस आहे म्हणूनच झाले. आता त्यांची नजर आकाशवाणी पुणे च्या जागेवर वळली आहे. पुण्याचे सांस्कृतिक महत्व कमी करण्याचा हा प्रकार आहे अशी टीका काँग्रेसने केली. जावडेकर यांनी तत्काळ दिल्ली गाठावी, पंतप्रधान मोदी यांची भेट घ्यावी, त्यांना पुणे शहराचे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील व जगातील महत्व पटवून द्यावे व हा निर्णय रद्द करून घ्यावा, अन्यथा काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने पुणेकरांना बरोबर घेत  तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जोशी यांनी दिला.

Web Title: prakash Javadekar do that much for Pune Congress demand anger over the decision of Akashvani Pune bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.