आधुनिक चाकांमुळे कुंभार व्यवसायाला बळकटी
By Admin | Updated: January 12, 2015 22:39 IST2015-01-12T22:39:03+5:302015-01-12T22:39:03+5:30
पारंपरिक कुंभार व्यवसायात आता काळानुरूप बदल होत आहे. आधुनिक यंत्रणा आल्याने या व्यवसायाला बळकटीमिळू लागली आहे.

आधुनिक चाकांमुळे कुंभार व्यवसायाला बळकटी
रिटा कदम, पिंपरी : पारंपरिक कुंभार व्यवसायात आता काळानुरूप बदल होत आहे. आधुनिक यंत्रणा आल्याने या व्यवसायाला बळकटीमिळू लागली आहे. हातांनी फिरवायचे चाक जाऊन आता विजेवर चालणारे चाक उपलब्ध होऊ लागल्याने श्रम वाचले आहे. शासकीय अनुदानही ही कला जिवंत ठेवण्यास मदतीचे ठरले आहे.
कुंभारवाड्याचे आणि चाकाचे नाते अतूट असे आहे. पूर्वी मातीला आकार देण्याचे काम लाकडी चाक करीत असे. कुंभार हे चाक लाकडी काठीने फिरवून त्यावर माठ, गाडगी, मडकी, सुगडी, पणत्या अशा सुबक वस्तू तयार करीत असत. मकरसंक्रान्तीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने सुगड्यांवर शेवटचा हात फिरविण्यात कुंभारवाडा दंग आहे.
आधुनिक चाक उपलब्ध झाल्याने कुंभारांचे श्रम वाचण्यास मदत झाली आहेत. तसेच कमीत कमी वेळेत अधिक वस्तूंची निर्मिती करणेही सहजशक्य झाले आहे. कामातील अर्धा वेळ चाकाला फिरवण्यात जात होता. यामुळे वस्तूंची संख्याही कमी असे. परिणामी उत्पन्नही कमी होत असे, असे कुंभारवाड्यातील कलावंतांशी बोलताना समजले. चाकाला विद्युत मोटार जोडली आहे. विजेचे बटण सुरू केले की चाक सुरू होते. पूर्वी लाकडी चाकावर दिवसाला ५०० वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जात होत्या. त्याता आता दुपटीने वाढ झाली आहे.
शासनाकडून आर्थिकदृष्ट्या गरजू, गरीब कुंभारांना मदत करण्याची योजना आहे. ‘खादी ग्रामोद्योगातून’ विद्युत चाकांचे वाटप केले जात आहे. तसेच बँकेकडून २० टक्के अनुदान दिले जाते. चऱ्होलीतील कुंभारवाड्यास भेट दिली. काही कुंभारांनी शासकीय अनुदानावर विसंबून न राहता, स्वखर्चातून विजेवर चालणारे चाक विकत घेतले आहे. ‘‘इंदापूर येथून दोन बाय दोन आकाराचे चाक खरेदी केले असून, त्याची किंमत अठरा ते वीस हजार रुपये आहे. या चाकांमुळे कष्टाचे काम कमी झाले.