मुळशीमधील काही गावांचा ४ दिवस दिवस वीजपुरवठा बंद, पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम

By नितीन चौधरी | Published: April 2, 2024 04:32 PM2024-04-02T16:32:15+5:302024-04-02T16:33:43+5:30

बुधवारी (दि. ३) २२ केव्हीच्या सहा वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहील...

Power supply off for four days in some villages in Mulshi, work to replace power transformer | मुळशीमधील काही गावांचा ४ दिवस दिवस वीजपुरवठा बंद, पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम

मुळशीमधील काही गावांचा ४ दिवस दिवस वीजपुरवठा बंद, पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम

पुणे : महापारेषण कंपनीच्या पिरंगुट २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचा नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम बुधवार (दि. ३) ते शनिवारपर्यंत (दि. ६) होणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत विजेच्या भारव्यवस्थापनासाठी महावितरणच्या काही २२ केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवावा लागणार असल्याने मुळशी तालुक्यातील काही गावांमध्ये चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात येणार आहे.

बुधवारी (दि. ३) २२ केव्हीच्या सहा वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहील. त्यामुळे रिहे, भरे, घोटावडे, मुळखेड, खांबोली, कातरखडक, पिंपोली, आंधाले या गावांसह काही उच्चदाब औद्योगिक अशा सुमारे ६५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील. गुरूवारी (दि. ४) २२ केव्हीच्या दोन वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने पिरंगुट गाव, पिरंगुट औद्योगिक परिसर, पौड, दारवली, करमोळी, चाले, दखणे, खुळे, साथेसाई, नांदगाव, कोंढावळे, रावडे, शेरे, वेलावडे, जामगाव, दिसली यासह कोळवण खोऱ्यातील सर्व गावे व वाड्यावस्त्यांमधील सुमारे १८ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील.

तसेच शुक्रवारी (दि. ५) २२ केव्हीच्या तीन वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद असल्याने भुगाव, भूकूम, खातपेवाडी, लवळे, चांदे, नांदे या गावांतील सुमारे २७ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील. तर शनिवारी (दि. ६) एप्रिलला उरवडे, कासारआंबोली, धोत्रेवाडी, आंबेगाव, मारणेवाडी, कोंढूर, कोंढावळे, आंधगाव, आंबरवेत, आमराळेवाडी, गडगावणे यासह मुठा खोऱ्यातील सर्व गावे व वाड्यावस्त्यांमधील सुमारे ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरण व महापारेषणकडून करण्यात आले आहे.

Web Title: Power supply off for four days in some villages in Mulshi, work to replace power transformer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.