संगीतात दु:ख दूर करण्याचे सामर्थ्य
By Admin | Updated: January 14, 2017 02:38 IST2017-01-14T02:38:47+5:302017-01-14T02:38:47+5:30
संगीत हे जीवनात चैतन्य निर्माण करते. मन दु:खी झाले, की मी लता, आशा आणि किशोरकुमार यांची गाणी ऐकतो. दु:ख विसरतो,

संगीतात दु:ख दूर करण्याचे सामर्थ्य
पिंपरी : संगीत हे जीवनात चैतन्य निर्माण करते. मन दु:खी झाले, की मी लता, आशा आणि किशोरकुमार यांची गाणी ऐकतो. दु:ख विसरतो, पुन्हा ताजातवाना होतो. संगीतात दु:ख दूर करण्याचे सामर्थ्य आहे, अशा भावना प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांनी चिंचवड येथे व्यक्त केल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल यांच्या वतीने आयोजित चिंचवड येथील विस्तारित चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन देव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आयुक्त दिनेश वाघमारे होते. व्यासपीठावर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, मुख्य संयोजक प्रवीण तुपे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, अभियंता सतीश इंगळे आदी उपस्थित होते.
सीमा देव म्हणाल्या, ‘‘पुरस्कार हे कलाकारासाठी टॉनिकसारखे असतात. कलावंतांच्या जीवनात ते महत्त्वाचे असतात. त्या ऊर्जेवरच कलाकार मोठा होतो. त्यामुळे कलाकारांना पुरस्कार मिळायला हवेत.’’
जब्बार पटेल म्हणाले, ‘‘अत्यंत सुनियोजितपणे विकसित झालेले हे शहर आहे. येथील रस्ते सुंदर आहेत. चित्रपट निर्मितीसाठी हा परिसर उत्तम आहे. आज उत्तम अभिनेता आणि खलनायकाची भूमिका उत्तमपणे पेलणारे कलावंत उपस्थित आहेत. चित्रपटसृष्टीतील रमेश-सीमा ही तरूण अशी जोडी आहे.’’
दिनेश वाघमारे म्हणाले, ‘‘सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी हा महोत्सव चांगला आहे. उत्तम चित्रपटांचे चित्रीकरण होण्यासाठी या परिसरात चांगल्या पायाभूत सुविधा निर्र्माण करणे आणि संस्था निर्माण करण्यासंदर्भात प्रयत्न व्हायला हवेत. चित्रपटनिर्मिती झाल्यास येथे रोजगार निर्मितीही होणार आहे. कलागुणांची जोपासना करण्यासंदर्भात प्रयत्न व्हायला हवेत.’’
प्रतिमा दातार यांनी सूत्रसंचालन केले. सतीश इंगळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)