लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चित्रपट किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कला या समाजामध्ये बदल घडवून आणू शकतात. कारण, यामध्ये लोकांच्या मनावर परिणाम करण्याची क्षमता असते. ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट समाज बदलाचे एक उत्तम उदाहरण आहे. कारण हा चित्रपट पाहिल्यानंतरच सिंबायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांना महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली, असे गौरवोदगार ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटातील प्रमुख अभिनेता ललित प्रभाकर यांनी काढले.
‘सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालयाच्या’ पहिल्या तुकडीचा प्रवेश/परिचय सोहळा सोमवारी (दि.१) महाविद्यालयाच्या खुल्या प्रांगणात, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, लवळे परिसर, येथे आयोजित केला होता. यावेळी ललित प्रभाकर सहअभिनेत्री भाग्यश्री मिलिंद, मंगेश कुलकर्णी-निर्माते, सिटी प्राईड मल्टिप्लेक्सचे संचालक अरविंद व प्रकाश चाफळकर तसेच सिंबायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिंबायोसिसच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, एसआययूच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते उपस्थित होत्या.
चित्रपटात आनंदीबाई गोपाळ जोशी यांची भूमिका साकारणाऱ्या भाग्यश्री मिलिंद हिने १८८६ सालच्या एका घटनेविषयी सांगितले. ती म्हणाली की, आनंदाबाई जोशी या डॉक्टर झाल्यावर देखील लोकांनी त्यांना डॉक्टर म्हणून स्वीकारले नाही. त्यावेळी अत्यंत अवघड परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतरही त्यांना स्वत: ला सिद्ध करावे लागले. डॉक्टर होऊनसुद्धा त्यांची लढाई संपली नाही. परंतु, त्यांनी मार्गात येणारे सर्व अडथळे पार केले आणि म्हणूनच आज १५० वर्षांनंतरही आनंदाबाई जोशी आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत.
सिंबायोसिस आणि सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय’ या दोन्हींच्या स्थापनेत साम्य (योगायोगाने) असल्याबद्दल डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सांगितले. यावेळी डॉ. मुजुमदार यांनी विद्यार्थिनींना नैतिकतेने सराव करण्याची शपथ दिली. तसेच, सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या ५ उच्च गुणवत्तेच्या मुलींना आनंदीबाई शिष्यवृत्ती प्रदान केली. ज्याअंतर्गत संपूर्ण एमबीबीएस अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क माफ केले आहे.
डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या की, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणे हे सोपे नव्हते. परंतु, आम्ही ते निर्धारित वेळेत पूर्ण केले. सिंबायोसिसचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि यावर्षी वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅचही सुरू होत आहे, आज मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याने खरोखर आनंद झाला आहे.
लेफ्टनंट कर्नल (डॉ) टी. विजय सागर, अधिष्ठाता, सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. राजीव येरवडेकर, अधिष्ठाता, आरोग्य विज्ञान विद्याशाखा, एसआययू यांनी महिला वैद्यकीय महाविद्यालयात घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय शिक्षणाबद्दलच्या विभिन्न पध्दतींविषयी नमूद केले. सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय नटराजन यांनी आभार प्रदर्शन केले.