पोटफोडे, केदारी राष्ट्रपती पदकाचे विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST2021-02-05T05:19:54+5:302021-02-05T05:19:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणारे राष्ट्रपती पदक ‘पीएमआरडीए’चे मुख्य अग्निशमन अधिकारी आणि पुणे अग्निशमन दलाचे ...

पोटफोडे, केदारी राष्ट्रपती पदकाचे विजेते
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणारे राष्ट्रपती पदक ‘पीएमआरडीए’चे मुख्य अग्निशमन अधिकारी आणि पुणे अग्निशमन दलाचे तांडेल यांना जाहीर झाला आहे. अग्निशामक दलाच्या दोन अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाल्याने दलाच्या जवानांनी आनंद व्यक्त केला आहे.
‘पीएमआरडीए’च्या मुख्य अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र प्रभाकर पोटफोडे आणि पुणे अग्निशमन केंद्राचे तांडेल राजाराम केदारी यांचा यात समावेश आहे. या वर्षासाठी अग्निशमन सेवा वैशिष्ट्य पूर्ण सेवेसाठी पुरस्कार प्राप्त करणारे पोटफोडे हे महाराष्ट्रातील एकमेव अग्निशमन अधिकारी आहेत. या पूर्वी २०११ मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पदक त्यांंना प्रदान करण्यात आले होते. त्यांचा ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी नागपुरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण घेतले असून ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. सन २००६ ते २००८ या कालावधीत त्यांनी पुणे शहराचे ते मुख्य अग्निशमन अधिकारी होते.
तांडेल राजाराम काळू केदारी हे १९८७ ला फायरमन या पदावर सेवेत दाखल झाले. आगीच्या घटना, बुडीत घटना, घरपडी, झाडपडी, रस्ते अपघात अशा विविध प्रकारच्या घटनांमध्ये नागरिकांची अत्यंत धाडसाने आणि जलद सुटका केलेली आहे. मुंढवा परिसरातील एका इमारतीमध्ये घुसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या पथकाचे नेतृत्व त्यांनी केले होते. पुरात अडलेल्या सोसायटी-झोपडपट्टीमधील नागरिकांची सुटका करण्याचे काम त्यांनी केले आहे. तळजाई पठार, धनकवडीमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनांमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात केदारी आघाडीवर होते. सेवाकालावधीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीकरिता राष्ट्रपती गुणोत्कृष्ट अग्निशमन सेवा पदक त्यांना जाहीर झाले.